Talegaon Dabhade : कोरोना निर्मूलनासाठी तळेगाव पॅटर्न राज्यात राबवावा – किशोर आवारे

दुकाने पूर्ण बंद, चौक व महत्त्वाची ठिकाणे स्वच्छ धुवून कीटकनाशकांची फवारणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  जनसेवा विकास समितीचे संस्थापक व उद्योजक  किशोर आवारे यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे व तळेगाव स्टेशन परिसरातील महत्वाचे चौक, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, यशवंत नगर, तपोधाम काॅलनी गुरुवारी (दि 19) धुवून काढले. या वेळी कीटकनाशक औषधांची फवारणीही करण्यात आली. हा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविला तर महाराष्ट्रातील कोरोना साथीवर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा दावा किशोर आवारे यांनी केला आहे.

या स्वच्छता मोहिमेत आमदार सुनील शेळके, तळेगाव नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक सुशील सैंदाणे, उद्योजक संतोष (अण्णा) शेळके, स्थानिक नगरसेवक निखील भगत, रोहित लांघे, सुनील पवार, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड तसेच वीर चक्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने ही टीम उपस्थित होती.

तळेगावातील अनेक कंपन्यांनी कामगारांना सुट्टी दिल्याने कामगार आपल्या गावी जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर नागरिकांची वर्दळ आहे. या परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी रेल्वे प्लॅटफार्म आणि परिसर धुवून काढून औषध फवारणी करण्यात आला. त्याचबरोबर स्टेशन परिसरातील स्टेशन चौक, छत्रपती शिवाजी चौक, तपोधाम काॅलनी, मराठा क्रांती चौकही धुवून काढून कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात आली.

ज्या पध्दतीने जनतेने या बंदला चांगला प्रतिसाद दिला. असाच तळेगाव स्टेशन पॅटर्न जर संपूर्ण महाराष्ट्रात राबविला तर कोरोना व्हायरस वर आपण नियंत्रण आणू शकतो अशी प्रतिक्रिया उद्योजक किशोर आवारे यांनी यावेळी दिली.

तळेगाव स्टेशन पॅटर्न राबविण्यात येत असताना आमदार सुनील शेळके व उद्योजक किशोर आवारे यांनी सर्व मावळवासीयांना आवाहन केले.   रेल्वेमध्ये प्रवास करताना नागरिकांनी सॅनिटायर बरोबर ठेवावे, मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणे व गर्दीत काळजी घ्यावी. स्वच्छता पाळावी, कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाला घाबरुन न जाता त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे हाच मोठा उपचार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like