Talegaon Dabhade : पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांबाबत विचारणा करणाऱ्या पतीचा खून; चौघांना अटक

तीन महिन्यानंतर गुन्ह्याची नोंद

एमपीसी न्यूज – पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधांबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पतीला दगडाने व लाथा बुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना गहूंजे येथे 30 मार्च रोजी घडली होती. जखमी पतीचा उपचारादरम्यान (दि. 5 एप्रिल) रोजी मृत्यू झाला. 10 एप्रिल रोजी या घटनेची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद तळेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मात्र, तब्बल तीन महिन्यानंतर तळेगाव पोलिसांनी हा अकस्मात मृत्यू नसून खून असल्याचा निष्कर्ष काढत खुनाचा गुन्हा नोंदवला.

पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार किरण निर्गुण बोडके, केतन महेंद्रकुमार भालेकर (वय 26, रा. वडगाव मावळ), नरेंद्र गोरखनाथ ढोले (वय 36, रा. तळेगाव दाभाडे), निखिल दिलीप बोडके (वय 25, रा. गहूंजे, ता. मावळ), ओंकार विलास बोडखे (वय 21, रा. गहूंजे, ता. मावळ), सोन्या बोडखे (रा. गहूंजे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन, नरेंद्र, निखिल, ओंकार यांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पत्नीचे किरण याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मृत व्यक्तीला होता. त्याबाबत विचारणा करण्यासाठी ते आरोपी किरण बोडके यांच्याकडे गहूंजे येथे आले. तिथे त्यांचा किरण याच्यासोबत वाद झाला. वादवादीतून भांडणे झाली, सर्व आरोपींनी मिळून संबंधित पतीला दगडाने व लाथा बुक्क्यांने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्यांचा 5 एप्रिल रोजी मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांनी केल्यानंतर हा अकस्मात मृत्यू नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत रविवारी (दि.30) रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.