Talegaon Dabhade : पिराजी वारींगे यांचा ‘शिक्षकरत्न’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – वारंगवाडी मावळ येथील शिक्षक नेते व भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन आणि टाकवे बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलचे उपशिक्षक पिराजी झिपाजी वारींगे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरवपरिषद 2019 चा पुरस्कार वितरण सोहळा दादर- मुंबई येथील सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडला.

राष्ट्रीय किर्तनकार व पत्रकार श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर, प्रसिद्ध कवी रमेश आव्हाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुणिजन परिवाराचे संस्थापक अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे यांनी भूषविले.

पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र, गौरवपदक असे आहे. वारींगे गेली तीस वर्षे अध्यापनाचे काम करीत आहेत. वारींगे हे शैक्षणिक, सामाजिक, सहकार आदी क्षेत्रांशी संबंधित असून त्यांना पंचायत समिती मावळ, पुणे जिल्हा परिषद, मावळ वार्ता, शिवक्रांती कामगार संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पवार चॅरिटेबल ट्रस्ट आदी संस्थानी आदर्श शिक्षक म्हणून त्यांना गौरविलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.