Talegaon Dabhade : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस शिपायाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीवरुन जात असलेल्या पोलीस शिपायाला मागून अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास सोमाटणे येथे मुंबई-पुणे मार्गावर घडली.

सागर भागवत नेहे (वय 28, रा. सावरगाव (तळ), ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सतीश शहादेव मिसाळ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर नेहे नवी मुंबई मधील खारघर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांच्या कामानिमित्त रविवारी पुण्याला आले. रविवारी रात्री तळेगावकडून पुण्याच्या दिशेने मोपेड दुचाकीवरून (एमएच 46 बीएल 8618) जात होते. ते सोमाटणे येथे आले असता त्यांना अज्ञात वाहनाने मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये सागर घसरून पडले. गंभीर जखमी झालेल्या सागर यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून निघून गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.