Talegaon Dabhade : ऑनलाईन जुगार अड्डयावर छापा; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तळेगाव पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 45 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तळेगाव रेल्वे स्टेशन जवळील वीरचक्र चौक येथे केली.

मयूर शिवाजी बोऱ्हाडे (वय 26, रा. शिरूर, जि. पुणे), कोमीर वसंत बुराडे (वय 28), अजय दिलीप गायकवाड (वय 19), विठ्ठल मानाजी सांगळे (तिघेही रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) असे अवैध ऑनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांना तळेगाव स्टेशन येथे बेकायदेशीर ऑनलाइन जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तळेगाव पोलिसांच्या पथकाने तळेगाव स्टेशन जवळ वीरचक्र चौकात सापळा रचून जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यावेळी चारही आरोपी ऑनलाइन जुगार अड्डा चालवीत होते. आरोपींकडून 8 हजार 400 रुपये रोख रक्कम, एक टीव्ही स्क्रीन, संगणक संच असा एकूण 45 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोपींना आज (गुरुवारी) वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, कर्मचारी सुर्यकांत गोरडे, विठ्ठल वडेकर, दीपक कदम आदींच्या पथकाने केली. तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.