Talegaon Dabhade: लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर आलेली अनावश्यक दुचाकी वाहने जप्त

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन कारणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या गाड्या तळेगाव दाभाडे पोलिसांनी जप्त केल्या. 

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषद व तळेगाव पोलीस स्टेशन संयुक्तपणे कारवाई करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे अनेक वेळा आवाहन करण्यात आले होते. तरीही काहीजण यागोष्टीकडे कानाडोळा करत गावातून गाड्यावरून विनाकारण फेरफटका मारत असतात. हातात मोकळ्या पिशव्या घेऊन दूध, भाजी, औषध व इतर किराणा वस्तू आणावयास चाललो, अशी कारणे सांगून प्रशासनाशी हुज्जत घालत असतात.

पोलिसांकडून आतापर्यंत नरमाईची भूमिका घेऊन शिथिलपणे कारवाई केली जात होती, मात्र यापुढे संचारबंदी काळात विनाकारण भटकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिला आहे.

 तसेच तळेगाव पोलीस स्टेशन कडून लिंब फाटा मारुती मंदिर चौक, तळेगाव स्टेशन चौक, यशवंतनगर, वडगाव फाटा, इंद्रायणी कॉलेज याठिकाणी पोलिसांच्या गस्ती चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी करून कारवाई केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.