Talegaon Dabhade : खासगी शाळेकडून पालकांची आर्थिक फसवणूक; पोलिसांच्या मध्यस्थीने मिळाला पालकांना न्याय

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथील हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी 30 हजार रुपये फी घेतली. परंतु पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश रद्द करावा लागला. पालकांनी भरलेली फी शाळेने परत करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते आणि तळेगाव पोलिसांनी लक्ष घालून शाळा आणि पालकांमध्ये समेट घडवून पालकांना न्याय मिळवून दिला.

तळेगाव येथील रहिवासी गणेश मराठे यांचा एक मुलगा कुमार हा सोमाटणे फाटा हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याचा लहान भाऊ कार्तिक याचा पुढील शैक्षणिक वर्षात पहिल्या वर्गासाठी प्रवेश घ्यायचा आहे. गणेश यांनी याच शाळेत प्रवेश घ्यायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी कार्तिकचा पहिल्या वर्गातील प्रवेश निश्चित केला. शाळेने पहिल्या वर्षासाठी मागितल्याप्रमाणे गणेश यांनी 30 हजार रुपये जमा केले.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, गणेश यांना कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींमुळे कार्तिक याचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे गणेश यांनी 24 तासाच्या आत शाळेशी संपर्क साधून प्रवेश रद्द करायचा आहे. प्रवेशासाठी भरलेली फी परत मिळण्याची विनंती केली. शाळा प्रशासनाने ‘एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नसल्याचे’ छापील उत्तर गणेश यांना दाखवले.

गणेश यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी भेट घेऊन पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे धाव घेतली. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन आणि अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी याप्रकरणात लक्ष घालून तळेगाव पोलिसांना आदेश दिले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शाळा व्यवस्थापन आणि पालक यांची समेट घडवून आणली आणि याबाबत तोडगा काढला. यामुळे छळवणूक झालेल्या पालकांना न्याय मिळाला तर शाळेला जरब बसली. गणेश मराठे यांनी पोलीस आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1