Talegaon Dabhade : सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी सुरू केले बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज – सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी (Talegaon Dabhade) सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. गुरुवारी पुकारलेल्या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. आता आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. टोल बंद होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया जनसेवा विकास समितीचे संस्थापक व कृती समितीचे प्रमुख किशोर आवारे यांनी दिली.
सोमाटणे टोलनाका अनधिकृत असून त्याद्वारे जनतेची होणारी फसवणूक थांबली पाहिजे,यासाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून पुकारलेल्या एक दिवसीय बंदला तळेगाव दाभाडे शहरासह मावळ तालुक्यातील सुमारे ३० गावांनी जाहीर पाठिंबा दर्शविला.
त्यामुळे जनसामान्यांनी भरभरून दिलेल्या 100 टक्के पाठिंब्यामुळे हे आंदोलन आता सर्वांचे झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक व कृती समितीचे प्रमुख किशोर आवारे यांनी दिला.
एमएसआरडीसी आणि आयआरबी तर्फे आलेल्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते किशोर आवारे यांच्याशी चर्चा केली. त्या दरम्यान अधोरेखित प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाले. लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून आपणास सकारात्मक अहवाल सादर करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शनिवार (दि. 11) हा उपोषणाचा पहिला दिवस असून कृती समितीतर्फे जनसेवा विकास समितीचे संस्थापक
अध्यक्ष किशोर आवारे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांसह सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद, निलेश पारगे, योगेश पारगे, प्रशांत मराठे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
उपोषणा दरम्यान खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मी आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी नुकतीच ही जनतेची होणारी फसवणूक मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यासंबंधी आम्ही पाठपुरावा करत असून हा (Talegaon Dabhade) टोल हटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
परंतु, अल्पावधीत टोलसंबंधित अधिकारी व राज्यसरकार यांनी सकारात्मक व समाधानकारक असा ठोस निर्णय घेतला नाही तर शांततेत चाललेलं हे उपोषण उग्र स्वरूप धारण करेल असेही बारणे म्हणाले. जोशी वाडीतील विठ्ठल मंदिरात सुरू केलेल्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते नागरिक बंधूभगिनी मोठ्या संख्येने भेट घेऊन पाठिंबा देत आहेत.