Talegaon Dabhade: नामवंत ज्येष्ठ डॉक्टर दिलीप भोगे यांचे कोरोना संसर्गामुळे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नामवंत ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. दिलीप प्रतापराव भोगे (वय 65) यांचे आज पहाटे साडेचारच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात कोरोना संसर्गावरील उपचारांदरम्यान निधन झाले. 

डॉ. भोगे यांच्या मागे पत्नी उषा, मुलगा डॉ. रोहित व कन्या पत्रकार नीलांबरी असा परिवार आहे. डॉ. दिलीप भोगे यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

डॉ. दिलीप भोगे हे तळेगाव जनरल हॉस्पिटल या संस्थेचे विश्वस्त तसेच माजी सचिव होते. मायमर मेडिकल कॉलेजच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते. सुमारे 40 वर्षे त्यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या माध्यमातून मावळातील जनतेला वैद्यकीय सेवा पुरविली. मावळातीलच नव्हे तर राज्यातील डॉक्टरांच्या सर्व प्रमुख संघटनांचे नेतृत्व त्यांनी केले होते. मावळ मेडिकल असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्षही होते.

खान्देशातील शहादा हे त्यांचे मूळ गाव होते. शहादा येथील म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये फिजिशियन म्हणून रुजू झाले.

मावळातील एक विश्वासू, मितभाषी व सर्वांना शक्य होईल तेवढे सहकार्य करणारे अनुभवी डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. तालुक्यातील सर्व प्रमुख व्यक्ती आणि संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. 1993 पासून त्यांनी वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रताप मेमोरियल हॉस्पिटल हे स्वतःचे रुग्णालय देखील चालू केले.

 

_MPC_DIR_MPU_II

लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, इंडियन मेडिकल असोसिएशन मावळ शाखा, खान्देश मित्र मंडळ , कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

कोविड संसर्गाच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी खूप पुढाकार घेऊन मावळातील कोविड रुग्णांवर उपचार केले. कोरोना विरुद्ध लढणाऱ्या या ज्येष्ठ कोरोना योद्ध्याला याच दरम्यान कोविड संसर्ग झाला. त्यामुळे त्यांना सुमारे दोन महिन्यांपूर्वी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरोनाबरोबरच अन्य शारीरिक विकार बळावल्याने वैद्यकीय गुंतागुत वाढत गेली आणि अखेर डॉ. भोगे यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. डॉ. भोगे यांनी आज पहाटे साडेचारच्या सुमारास जगाचा निरोप घेतला.

मावळ तालुक्यातील एका ज्येष्ठ कोरोना योद्ध्याचे कोविड संसर्गामुळेच निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.