Talegaon Dabhade: नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तरच उद्योग-व्यवसायात अस्तित्व टिकेल – रणजीत काकडे

एमपीसी न्यूज- नवनवीन तंत्रज्ञानाचा आपण वापर केला तरच आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायात आपले अस्तित्व आजच्या काळात सिद्ध करता येणार आहे, असे मत आर. एम. के. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक व युवा उद्योजक  रणजीत काकडे यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय तसेच इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या तिन्ही महाविद्यालयाच्या वतीने भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रणजीत काकडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, खजिनदार  चंद्रकांत शेटे, कार्यवाह रामदास काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, विश्वस्त शैलेश शहा, महाविद्यालय विकास समिती सदस्य विलास काळोखे, चंद्रभान खळदे, संजय वाडेकर, प्राचार्य डॉ. बी. बी.जैन, प्राचार्य जी. एस. शिंदे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य ए. आर. जाधव, पत्रकार विलास भेगडे, जगन्नाथ काळे, प्रा. एम. एम. ताटे, प्रा. साहेबराव गावडे, प्रा. रविकांत सागवेकर, प्रा. भीमराव काशिदे आदी उपस्थित होते.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेला 11 लाख 51 हजारांची देणगी

रणजीत काकडे यांनी आपल्या आईवडिलांकडून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्कार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे .नुकतेच त्यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेला 11 लाख 51 हजार रुपयांची देणगी देऊन सामाजिक दातृत्व जोपासले आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते रणजीत काकडे यांचा  स्वागत व सत्कार  करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रणजीत काकडे म्हणाले की, आज उद्योग-व्यवसायात खूप मोठी संधी आहे,परंतु एकीकडे खूप मोठी स्पर्धा देखील आहे. त्यासाठी आपल्याजवळ प्रखर बुद्धिमत्ता, नवनवीन संशोधन करण्याची वृत्ती, जिद्द कष्ट करण्याची वृत्ती व चिकाटी असणे आवश्यक आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यास, संशोधन वृत्ती, जिद्द आणि चिकाटी या गोष्टी विद्यार्थ्यांनी जोपासल्या पाहिजेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डाॅ.संभाजी मलघे यांनी केला. रणजीत काकडे यांना बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने उत्कृष्ट बिल्डर अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आल्याचे सांगून त्यांचा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान झाल्याचे नमूद करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.