Talegaon Dabhade: ‘लिटील हार्ट’मधील इमारत ‘सील’ केल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोयीची तक्रार

कनटेनमेंट झोन रद्द करून दोन दिवसांत सुविधा न दिल्यास आंदोलन - प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील लिटिल हार्ट सोसायटी बिल्डिंग नंबर 9 कंटेनमेंट झोन घोषित केल्याने त्या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्यांची गैरसोय होत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी त्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सवलत देण्याची मागणी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे केली. 

लिटील हार्ट सोसायटीतील नऊ नंबरच्या बिल्डिंग covid-19 प्रवेश बंदी केलेली आहे.याकरिता काल नाईक तळेगाव दाभाडे येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड  तसेच उप मुख्याधिकारी सुप्रिया शिंदे  यांची भेट घेतली. तेथील नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत.  कुठलीही पूर्वकल्पना न देता तेथील नागरिकांची राहणारी बिल्डिंग सील करण्यात आलेली आहे.

 प्रदीप नाईक म्हणाले की, तेथील नागरिकांना गेल्या १० दिवसांपासून कुठल्याही प्रकारची साफसफाई त्यांच्या वसाहतीमध्ये नाही तसेच कुठल्याही प्रकारे त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे फळ भाज्या अन्नधान्य  आणण्याकरिता त्यांना बाहेर पडू दिले जात नाही. तसेच तेथील काही नागरिक कंपनीमध्ये काम करीत आहेत. त्यांना सुद्धा कामावर जाऊ दिले जात नाही. तेथील काही नागरिकांचे हातावर पोट आहे त्यांना कामावर देखील सुद्धा जाऊ दिले जात नाही. बिल्डिंगमध्ये स्वच्छता नाही.

या संदर्भात मुख्याधिकारी झिंजाड व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना या वस्तुस्थितीबद्दल माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर तेथील रहिवाशांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्याचे तसेच व कंटेनमेंट झोनबाबत उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्याशी बोलून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी नाईक व लिटील हार्ट सोसायटीच्या शिष्टमंडळास दिले.

येत्या 2 दिवसांत जर तेथील नागरिकांची व्यवस्थितरीत्या सोय केली नाही त्रास कमी झाला नाही तर लिटील हार्ट सोसायटीतील नागरिकांसह नगरपालिकेपुढे आंदोलन करू याची मुख्याधिकारी यांनी दखल घ्यावी, असा इशारा प्रदीप नाईक यांनी यावेळी दिला. वार्ड क्रमांक पाचमधील नगरसेवक संतोष शिंदे या वेळेस स्वतः नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित होते.

कोरोनाबाधित पाचपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यानंतर बिल्डिंग किंवा तेथील परिसर सील केला जातो. असे असताना एका रुग्णासाठी संपूर्ण बिल्डिंगमधील रहिवाशांना का त्रास दिला जात आहे, सापडलेल्या रुग्णाला रुग्णालयात न पाठवता घरीच का आयसोलेट केले, रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता आपण बिल्डिंग कशी सील केली याचे उत्तर मुख्याधिकारी झिंजाड यांनी नागरिकांना द्यावे, असे नाईक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.