Talegaon Dabhade : रोटरी क्लबतर्फे 19 एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त 19 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वधर्मीय बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्यात यंदा 100 जोडप्यांच्या विवाहाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष शंकरराव जाधव, समन्वयक यादवेंद्र खळदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी अध्यक्ष मंगेश गारोळे,जयवंत देशपांडे, उद्धव चितळे ,विलास शहा, .ऋषिकेश कुलकर्णी, अरुण बारटक्के, अनिश होले, निलेश वाकचौरे आदी उपस्थित होते.

लग्न बंधनातील नववधू-वरांना क्लबतर्फे संसारपयोगी साहित्य, पोषाख, सिलिंडर जोडणीसह गॅस शेगडी, शिवणयंत्र व घड्याळ आदी भेटवस्तू देण्यात येणार आहे. गेल्या २३ वर्षांत क्लबतर्फे ९०० विवाह लावण्यात आले आहेत.

मावळातील दुर्गम व डोंगरी भागासह जिल्ह्यातील विविध तालुक्यात क्लबचे पदाधिकारी सामुदायिक विवाहाबाबत समाजप्रबोधन करीत असून ,त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शंकरराव जाधव व यादवेंद्र खळदे यांनी सांगितले.

विवाह नोंदणीची अखेरची तारीख ३१ मार्च आहे. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे. 19 एप्रिल रोजी येथील अँड.पु. वा. परांजपे विद्यालयाच्या प्रांगणात हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे.

विवाह नोंदणीसाठी तळेगाव लिंब फाट्याजवळील प्रॉफिट प्लाझा इमारतीमधील शॉप नंबर १३ मध्ये सोय करण्यात आली आहे. नोंदणीसाठी ९६०४४००६०६ किंवा ९४२२५०२०८२ या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.