Talegaon Dabhade: ‘कोरोनामुक्त’ शहरासाठी दोन दिवस ‘बंद’ पाळण्याचे राजघराण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे हे आपले ऐतिहासिक परंपरा असलेले शहर यापुढेही कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी उद्या व परवा (गुरुवार व शुक्रवार) कडकडीत बंद पाळून सहकार्य करावे, असे आवाहन सरसेनापती दाभाडे घराण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

सरसेनापती दाभाडे घराण्यातील माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे  दाभाडे व सत्यशीलराजे दाभाडे या तिघांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात हे आवाहन करण्यात आहे.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात तळेगावकरही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबई या मोठ्या शहरांच्या मध्ये तळेगाव दाभाडे शहर आहे या तिन्ही मोठ्या शहरांमध्ये कोरोनामुळे भयानक परिस्थिती झालेली आहे. नगरपरिषद, शहरातील समाजसेवक व काही समाजसेवी संस्था यांनी  गेले 15 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करून नागरिकांच्या सहकार्याने प्रभावी उपाययोजना केल्याने आपले शहर कोरोनामुक्त राहिले आहे, त्यामुळे आपण सर्वजण अभिनंदनास पात्र आहात, असे निवेदनात म्हटले आहे.

तळेगाव दाभाडे शहराने कोरोना विरुद्ध लढताना नियोजनाचा व शिस्तीचा चांगला आदर्श घालून दिला असून त्यामुळे शहराचा नावलौकिक देशभर वाढला आहे. अनेक ठिकाणी ‘तळेगाव दाभाडे पॅटर्न’चे अनुकरण होत आहे. ही अभिमानाची बाब आहे, असे निवेदनात म्हटले आहे.तळेगाव दाभाडे शहर 9 व 10 एप्रिल रोजी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय तळेगाव दाभाडे नगरपरिषद व तळेगावातील समन्वय समितीने घेतला आहे. त्याला शहरातील सर्व नागरिकांनी एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन सरसेनापती दाभाडे घराण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.