Talegaon Dabhade : पोटनिवडणुकीत आमदार शेळके यांच्या उमेदवाराचा 68 टक्के मते मिळवत एकतर्फी विजय

बाळा भेगडे यांना मावळात सलग दुसरा धक्का, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपचे बहुमत संपुष्टात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात ब मध्ये तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके या 795 मतांनी विजयी झाल्या. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सलग दुसरा धक्का दिला आहे. बाळा भेगडे यांनी प्रतिष्ठेची बनवलेली ही निवडणूक सुनील शेळके यांच्या उमेदवाराने 68 टक्के मते मिळवत एकतर्फी जिंकली. या पराभवामुळे नगरपरिषदेतील भाजपचे स्पष्ट बहुमत देखील संपुष्टात आले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांना एकूण 1,452 तर भाजपचे उमेदवार कृष्णा मारुती म्हाळस्कर यांना 657 मतांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी बाळा भेगडे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पण या विजयामुळे सुनील शेळके यांनी त्यांची प्रभागावरील पकडही भक्कम असल्याचे दाखवून दिले.

तळेगाव नगर परिषदेत 26 पैकी 14 जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले होते. सुनील शेळके यांच्या पाठोपाठ त्यांचे चुलतबंधू संदीप शेळके यांनी देखील भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपचे संख्याबळ घटून 12 झाले. सभागृहातील बहुमत टिकविण्यासाठी भाजपला पोटनिवडणुकीतील विजय महत्त्वाचा होता, मात्र पोटनिवडणुकीत भाजपने जागा गमावल्यानंतर विरोधकांचे पारडे जड झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समितीचे संख्याबळ 13 झाले आहे.

तळेगाव नगरपरिषदेत भाजपच्या नगराध्यक्षा असल्या तरी सभागृहात विरोधकांचे बहुमत झाल्याने भाजपची पुढील वाटचाल खडतर बनली आहे. संदीप शेळके यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सहा फेब्रुवारीला होणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकली तरच भाजपला सभागृहात कामचलाऊ बहुमत मिळू शकणार आहे, मात्र त्या पोटनिवडणुकीतही भाजपला आस्मान दाखवून बहुमत अधिक बळकट करण्याची व्यूहरचना तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती यांनी आखल्याचे समजते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता पुढील पोटनिवडणुकीकडे लागले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like