Talegaon Dabhade : भुयारी गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात शाळकरी विद्यार्थ्यांचा टेम्पो अडकला

एमपीसी न्यूज- भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात शालेय विद्यार्थ्यांचा टेम्पो अडकून काही मुले खाली पडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी कडोलकर कॉलनीमध्ये घडली. या निमित्ताने तळेगाव शहरात सुरु असलेल्या भुयारी गटाराच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तळेगांव शहरात सध्या नगरपरिषदेच्या वतीने भुयारी गटारांची कामे गेल्या महिनाभरापासून चालू आहेत. टेल्को काॅलनी, कडोलकर काॅलनी, राजगुरव काॅलनी या भागामध्ये ही कामे सुरु आहेत. या कामासाठी जागोजागी खड्डे खणण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून येण्या-जाण्यासाठी वाहतुकीस अडथळा होतो. पादचाऱ्यांना कसरत करीत चालावे लागत आहे. एकाही ठिकाणचे काम पूर्ण न केल्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

ही कामे ठेकेदारांना देण्यात आली असून ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या कामामुळे भूमिगत केबल तुटण्याच्या घटना देखील घडत आहेत. रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणारी पाईपलाईन फक्त सहा इंच व्यासाची असून संपूर्ण परिसराचा विचार करता ही अपुरी असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून भविष्यात पाइपलाइन तुंबून गटारीचे पाणी रस्त्यावर पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याकामाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून तक्रारी व नाराजी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.