Talegaon Dabhade : शहीद भाई कोतवाल चित्रपटातून चमकले तळेगावचे दोन कलाकार

सिनेमॅटोग्राफर तुषार विभुते व अभिनेता निरंजन खाडे

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित शहीद भाई कोतवाल हा चित्रपट आजपासून रसिकांच्या भेटीला आलेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तळेगाव मधील दोन कलाकाराचे पदार्पण झाले आहे. भाई कोतवाल यांचा सहकारी वामन भोईर यांची भूमिका केलेले कलाकार अभिनेते निरंजन खाडे व या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर तुषार विभुते या दोन तळेगावच्या कलाकारांशी केलेला संवाद.

स्वातंत्र्यलढा म्हणजे एक यज्ञच होता, एक महाकाय यज्ञ जो गुलामगिरी विरुध्द मानसिक, शाररीक तसेच आर्थिक स्वातंत्र्यासाठी केलेला तो हुंकार होता. , ही अमर ज्योती अशीच फुलावी ,या साठी दिवस रात्र एक केली जात होती, मार्ग वेगळे, पण ध्येय एकच ! आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणे. हीच निष्ठा बाळगून अनेक तरुण, वृद्ध, लहानगे, या समरांगणात आहुती देण्यासाठी सज्ज होते. अन हीच रोमहर्षक, प्रेरणादायी कथा पडद्यावर येत आहे ‘वीर भाई कोतवाल’ या चित्रपटाच्या रुपाने.

या चित्रपटात भाई कोतवाल यांचा सहकारी वामन भोईर यांच्या महत्वाच्या भूमिकेत तळेगावचे सुपुत्र अभिनेते निरंजन खाडे चमकले आहेत. या भूमिकेबद्दल निरंजन खडे म्हणाले की, नव्या पिढीने हा चित्रपट आवर्जून बघावा, यातुन एक जबरदस्त राष्ट्रभक्तीची प्रेरणा आपल्या मनात जागृत होईल. तसेच देशासाठी खूप काही करण्याची उर्मी तयार होईल.

चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना निरंजन खाडे सांगतात की चित्रपट ज्या ठिकाणी भाई कोतवाल यांचे कार्य घडले, जिथे क्रांतीची बीजं रोवली गेली अशा मुरबाड, सिध्दगड, कर्जत, माथेरान, या ठिकाणी हा चित्रपट चित्रित झाल्याने भूमिकेला जिवंतपणा येण्यास मदत मिळाली. सगळेच कलाकार चित्रीकरणादरम्यान त्या त्या व्यक्तीरेखाच होऊन गेले होते.

हा चित्रपट ज्यांच्या नजरेतुन चित्रित होऊन आपल्याला दिसतो ते सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर तुषार विभुते हे तळेगाव येथील रामभाऊ परुळेकर शाळेचे विद्यार्थी. त्यांनी आजपर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे छायालेखन केले आहे. बॉर्डर या गाजलेल्या हिंदी सिनेमाची सिनेमॅटोग्राफी त्यांचीच आहे. त्यांनी हा चित्रपट उत्तमरीत्या चित्रित केला आहे. तुषार विभुते म्हणाले की हा चित्रपट उत्तम टीमवर्क ने बनलेला आहे. दिग्दर्शक एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी तसेच निर्माते प्रवीण दत्तात्रय पाटील यांनी पुर्ण सहकार्य तसेच विश्वास दाखवल्याने ते हा वास्तववादी चित्रपट चित्रीत करु शकलो. खरतर हे एक शिवधनुष्य होते, तो काळ उभा करायचा, त्या जागी जाऊन चित्रपट चित्रित करायचा, म्हणजे खरच अवघड काम, पण या चित्रपटाच्या संपूर्ण टीम ने ही जवाबदारी लीलया पार पाडली आहे.

हा चित्रपट निश्चितच रसिकांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघावा, आणि आपल्या देशासाठी महान हुतात्म्यांनी काय काय केले आहे याच्या स्मृती जागवाव्या आणि यातुन योग्य प्रेरणा घ्यावी. ही अपेक्षा आणि हा चित्रपट नक्की पाहावा असे आवाहन चित्रपटाच्या टीमने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.