Talegaon Dabhade : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मोठ्या रकमेच्या मोबदल्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांसोबत कायदेशीर करार करून ही फसवणूक केली जात असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.

नवनाथ आसाराम राठोड (वय 29, रा. मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, लक्ष्मण हरिभाऊ जोरी (रा. बिबवेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ यांची आरोपी लक्ष्मण याच्यासोबत एका मित्राच्या मदतीने ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेऊन लक्ष्मण याने शेअर मार्केटमध्ये दोन लाख रुपये गुंतवल्यास तीन महिन्यांनी चार लाख 40 हजार रुपये परत मिळतील, असे आमिष दाखवले. तसेच त्याबाबतचा करार देखील आरोपीने नवनाथ यांच्यासोबत केला. नवनाथ यांनी लक्ष्मण याला दोन लाख रुपये दिले. त्यातील दीड लाख रुपये एका कंपनीत गुंतवण्यास सांगितले. नवनाथ यांनी शेअर मार्केटसाठी लागणारे डी मॅट अकाउंट काढले. त्याचा खाते नंबर व पासवर्ड लक्ष्मण याला दिला.

डी मॅट खाते सुरु झाल्यानंतर नवनाथ यांच्या खात्यात पाच टप्प्यांमध्ये 47 हजार 442 रुपये परत आले. त्यांनी गुंतवलेल्या दोन लाख रुपयांपैकी केवळ 47 हजार रुपये आले. उर्वरित 1 लाख 53 हजार रुपयांबाबत विचारणा केली असता लक्ष्मण याने दोन बँकांचे दोन धनादेश दिले. मात्र, ते धनादेश वटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवनाथ यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले, “लक्ष्मण जोरी ही व्यक्ती शेअर बाजार खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहे. माध्यमांमध्ये बनावट जाहिराती देऊन जास्त पैशांचे अमिश दाखवून आरोपीने अनेक लोकांना लुटले आहे. प्रत्येक लाखाला महिन्याला 40 टक्के परतावा देण्याचे आमिष आरोपी सर्वसामान्य लोकांना दाखवतो. फसवणुकीचं हे एक मोठं रॅकेट आहे. पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी सर्रासपणे लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून, करारनामा लिहून देऊन आणि दिलेल्या पैशाच्या सुरक्षेसाठी बँकेचा धनादेश दिला जात आहे. आरोपीने दिलेले सर्व धनादेश बाऊन्स होतात. लाखो रुपयांची ही फसवणूक असून नागरिक पैसे मागण्यासाठी गेले असता उलट त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपींकडून देण्यात येते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.