Talegaon Dabhade: घ्या श्री डोळसनाथ महाराजांचे ऑनलाईन दर्शन! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचे मंदिरही गुढी पाडवा या उत्सवाच्या दिवशी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद असले तरी ‘एमपीसी न्यूज’ने श्री डोळसनाथ महाराजांची आजची छायाचित्रे दर्शकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. घेऊयात श्री डोळसनाथ महाराजांचे ऑनलाईन दर्शन!

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जत्रा रद्द करण्याचा आदेश यापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार इतिहासात पहिल्यांदाच गुढी पाडव्याला तळेगावमध्ये श्री डोळसनाथ महाराज उत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे.

मंदिराच्या पुजाऱ्यांनी मध्यरात्री नंतर गाभाऱ्यात फुलांची सजावट करून श्री डोळसनाथ महाराजांची महापूजा केली. त्या वेळेस उत्सव समितीचे अध्यक्ष गोकुळ अनिल भेगडे, खजिनदार प्रणव मारुती भेगडे, उद्योजक सोमा भेगडे, अजिंक्य सातकर, राजेश सरोदे व ग्रामपुरोहित अतुल रेडे असे मोजके जण उपस्थित होते. जगावरील संकट टळून सर्वांना निरोगी आरोग्य लाभो, असे साकडे श्रींना घालण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील गुढी पाडव्याची जत्रा ही जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जत्रांपैकी एक आहे. श्री डोळसनाथ महाराजांची मिरवणूक, लोकनाट्य, ऑर्केस्ट्रा, कुस्त्यांचा आखाडा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या जत्रेच्या निमित्ताने दरवर्षी काही लाख लोक तळेगावमध्ये जमतात. यंदा प्रथमच पाडव्याच्या दिवशी शहारात मोकळे रस्ते आणि शांतता अनुभवायला मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.