Talegaon Dabhade : रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मायमर मेडिकल कॉलेजतर्फे ‘मायमर मावळ जनआरोग्य योजना’

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज आणि डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण जनरल हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी वर्षारंभानिमित्त परिसरातील रूग्णांसाठी वर्षभर मोफत असलेली ‘मायमर मावळ जनआरोग्य योजना’ राबविण्यात येणार आहे. माईर एमआयटी संचलित मायमर मेडिकल कॉलेजच्या 25 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी या योजनेची बुधवारी (दि.21) घोषणा केली.

अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे तर प्रमुख पाहुण्याम्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ डॉ. अशोक निकम, राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ.अरूण जामकर, प्राचार्य डॉ.आर.के. गुप्ता उपस्थित होते.

रौप्यमहोत्सवी वर्षातील कार्यक्रमांची माहिती देताना डॉ.नागरे म्हणाल्या, ‘’रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य व मावळ परिसरातील जनतेप्रती कृतज्ञता म्हणून “‘मायमर मावळ जनआरोग्य योजना” सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी, बालक आरोग्य तपासणी कार्यक्रम, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आरोग्य तपासणी कार्यक्रम, ग्रामीण भागातील/ सर्वदूर खेडोपाडी आरोग्य तपासणी निदान व उपचार शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात आंदरमावळातील वाऊंड गावापासून दि 28 ऑगस्टपासून करत आहोत.

हॉस्पिटल आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित ‘मायमर मावळ जनआरोग्य योजना’ असून मावळ परिसरातील दूरगामी गावे वाड्यावस्त्यांवर जावून रूग्णांची तपासणी केली जाईल. औषधोपचारासाठी त्यांना हॉस्पिटलतर्फे वाहनांची सोय करण्यात येणार आहे. ही सेवा वर्षभर विनाशुल्क देण्यात येईल’’

डाॅ नागरे पुढे म्हणाल्या,”डाॅ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालय हे मावळ व परिसरातील सर्वात मोठे व सुसज्ज सर्वोपचार रूग्णालय आहे. आज रोजी रूग्णालयात सर्वसामान्य शस्त्रक्रिया व आजारांवरील उपचारांसोबत विशेषोपचार व अतिविशेष शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या सर्व शस्त्रक्रिया व उपचार नाममात्र दरात करण्यात येत आहे. हे कार्य पुढेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करीत चालू ठेवणार आहे. मावळ व परिसरातील जनतेच्या प्रेम व विश्वासामुळे आणि संस्थेच्या रूग्णकेंद्रीत सेवेमुळे हा प्रवास शक्य झाला आहे.

एम बी बी एस अभ्यासक्रमाच्या 150 जागा असून आतापर्यंत 2000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 26 लाख 16 हजार रूग्णांना सेवा दिली आहे. तर 22 लाख लोकांच्या छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. हे सर्व श्रेय शिक्षकांना जाते आहे. हे एमआयटीचे वेगळेपण आहे” असे डॉ. नागरे म्हणाल्या. 700 खाटांचे हाॅस्पिटल व 35 अतिदक्षता विभागाचे खाटा असलेले सुसज्ज रूग्णालय असल्याचे डॉ नागरे यांनी सांगितले.

या योजनेसोबत इतरही अनेक आरोग्य सेवा कार्यक्रम वर्षभरात आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन डाॅ सुचित्रा नागरे यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे उपप्राचार्य डाॅ धनाजी जाधव, सुरेशभाई शहा, नगरसेविका संध्याताई भेगडे, राजाभाऊ नाखरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी शासनाच्या आज जारी झालेल्या निर्देशाचा संदर्भ देताना सांगितले, की नगरपालिकेमार्फत घेण्यात येणा-या आरोग्य शिबिरांसाठी मायमर मेडिकल कॉलेजची केंद्र सरकारने निवड केली आहे. लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य दिले जाईल.

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी देशाच्या पारतंत्र्याच्या काळात 1925 साली व्यक्त केलेली मेडिकल कॉलेजच्या उभारणीची संकल्पना 1995 सालात प्रत्यक्षात आल्याचे सांगताना कृष्णराव भेगडे म्हणाले, “तळेगाव जनरल हॉस्पिटल अॅण्ड कॉन्व्हलसंट होमच्या स्थापनेस की न.चिं. केळकर, 25व्या वर्षपूर्तीस महर्षि धोंडो केशव कर्वे, 50व्या वर्षपूर्तीस यशवंतराव चव्हाण आणि अमृतमहोत्सवी समारंभास शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे मायमरने मेडिकल कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता त्याच तोडीच्या विचारवंताला आमंत्रित करून भव्यदिव्य करावी. सर्वधर्माच्या विश्वस्तांची परंपरा राखत गोरगरीबांना आरोग्यसेवा सहज मिळेल असे प्रयत्न करावेत”. यावेळी डॉ. दिलीप भोगे, डॉ. अरूण जामकर यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाचे संयोजन डाॅ दर्पण महेशगौरी, डाॅ तुषार खाचणे, डाॅ डेरीक डिसूजा, डाॅ सुषमा शर्मा, जनसंपर्क अधिकारी राहूल पारगे आदींनी केले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. स्वाती राजे यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. आर.के. गुप्ता यांनी मानले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीत डाॅ भाऊसाहेब सरदेसाई यांनी 1925 साली स्थापन केलेल्या तळेगाव जनरल हाॅस्पिटल अॅण्ड काॅन्व्हलसेंट होम व त्यांच्या विश्वस्तांची तसेच स्व. डाॅ मधुसूदन पांडव यांची मोलाची मदत झाली. माजी आमदार कृष्णराव भेगडे, स्व. अॅड दादासाहेब परांजपे, स्व. डाॅ बी जी फडके इत्यादीचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.