Talegaon Dabhade : जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या मार्गानेच मोक्षप्राप्ती- हभप नितीनमहाराज काकडे

एमपीसी न्यूज- उत्तम व्यवहार करून द्रव्य मिळवावे. पण त्याची आसक्ती न ठेवता ते उदासपणे खर्च करावे, असा व्यवहार जो करील तो उत्तम गती मिळवून चांगले भोग भोगील असा संदेश तुकाराम महाराजांनी दिला. तुकाराम महाराजांनी मोजून मापून, सूक्ष्म पध्दतीने संसार केला. त्यांची सावकारी होती. पण आपल्या धंद्याला गती मिळवायची तर जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या मार्गानेच तुकोबांनी संसार केला असे प्रतिपादन हभप नितीनमहाराज काकडे यांनी केले.

समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प संत तुकाराम या विषयावर गुंफताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर दाभाडे, नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतदादा खांडगे, संस्थापक संतोषशेठ खांडगे, उपाध्यक्ष कैलास काळे, शंकर हादिमणी, गणेश काकडे, नितीनमहाराज काकडे, स्वाती दाभाडे. उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे उदघाटन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

हभप नितीनमहाराज काकडे म्हणाले, “तुकाराम महाराज आपल्याकडे जे आहे ते देत राहिले, घ्यायचं कधीच शिकवलं नाही, नेहमी दुस-याला देत राहिले. दुष्काळ पडला धान्याचे कोठार उघडले. वाटप केले. दुष्काळात द्रव्य आटले. ज्यावेळी द्रव्य, धन संपते, तेव्हा समाज त्या व्यक्तीचे ऐकत नाही, मानत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे लोकं येतात. पैसा ठेवत जा…. द्रव्य नसेल तर लोकं नावं ठेवतात. दुष्काळाच्या परिस्थितीत जिजाबाईनी त्यांना मदत केली. अशा परिस्थितीमध्ये त्यांची दुसरी पत्नी गेली, पण ते रडत बसले नाहीत. उपासमार झाली, अनेक आघात आले. एकाने ज्वारीचे शेत राखायला दिले. महाराज भजन करायचे व पाखरं धान्य खात. ही पाखरे येथे येऊन तृप्त होतात परंतु बरोबर काहीही घेऊन जात नाहीत. यामुळे त्यांना दुप्पट पीक आलं आणि ते विकून त्या पैशातून मंदिराचा जीर्णोद्धार केला”

“तुकाराम महाराजांनी रंजल्या गांजलेल्या लोकांचा विचार केला. गोरगरिबांना मदत केली स्वतःला धन्य मानले. साधूचं जीवन जगून आत्महिताला विसरले, उपकारासाठी संसारात आलो असेच ते म्हणायचे. महाराजांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही. बकरी, कोंबडी कापून दिली नाही. चांगले वागा, धर्म पाळा, संयमित जगा, नितीने जगा हा मंत्र दिला. जो मनात कपट बाळगतो, त्याने गळयात माळ घालू नये. ज्याला दया, क्षमा, शांती आणि धर्मनिष्ठा नाही, त्याने अंगाला विभूती लावू नये. ज्याला भक्तीचा महिमा कळत नाही, त्याने ब्रम्हज्ञानाच्या गोष्टी बोलू नयेत. ज्याचे मन ताब्यात आलेले नाही, त्याने प्रपंच टाकू नये. तुकाराम महाराज म्हणतात, ” ज्याला हरिभक्ति नाही, त्याने भगवे वस्त्र हाती धरू नये, संन्यास घेऊ नये ”

“तुकाराम महाराज यांनी फक्त भजन केले नाही तर ते उत्तम हे समाज सुधारक होते. समाजाला अंधश्रध्देतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी आपल्या अभंगातून केले. उत्तम शेती, पर्यावरण, उत्तम प्रपंच, उत्तम परमार्थ, उत्तम राजकारण कसं करावं हे तुकाराम महाराजांनी सांगितले. समाज संघटित कसा करावा. माणसाचा साधू आणि साधूचा भगवंत होण्याची प्रक्रिया तुकाराम महाराजांनी सांगितली. तुकोबा म्हणायचे, ‘अभ्यास केला तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. दो-याने दगडाला घर्षण केले तर दोरा सुद्धा दगडाला कापू शकतो. या मागे फक्त अभ्यास असू शकतो. आपल्या कमाईतला काही भाग हा धर्माकरिता खर्च झाला पाहिजे, हा संदेश चारशे वर्षांपूर्वी समाजाला दिला आहे. हे सर्व कार्य करून प्रपंच करीत असतांना नामसाधना केली. जप, तप, यज्ञ, याग, व्रतवैकल्ये या गोष्टी न करता पारमार्थीक साधना करतांना जगाच्या कल्याणाचाच विचार केला म्हणूनच ते आकाशा एवढे झाले”

कृष्णराव भेगडे म्हणाले, “आजचं जग धावतं आहे. सुखाच्या शोधात असलेले जग, संताच्या विचारांची गरज आहे. विश्व शांतीसाठी हे विचार फार उपयोगी आहेत”. प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष खांडगे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व अभंगाने झाली. यावेळी राज्यसेवा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या तळेगाव दाभाडे (माळवाडी) येथील स्वाती दाभाडे हीचा विशेष सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. सूत्रसंचालन लक्ष्मण मखर व श्रीमती कुसुम वाळुंज यांनी केले. आभार कैलास काळे यांनी मानले.

यावेळी दीपक दाभाडे, हभप मनोहर ढमाले (मामा), प्रा दीपक बिचे, सुचेता बिचे, नंदकुमार काळोखे, महेश शहा, अॅड मच्छिंद्र घोजगे तसेच तळेगावकर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.