Talegaon Dabhade : रेशनवरील धान्याचा काळाबाजार थांबवा – जमीर नालबंद

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यामध्ये अन्न सुरक्षा कायद्याखाली देण्यात येणाऱ्या अन्नधान्य वाटपात रेशन दुकानदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून सहकार्य होत नसल्यामुळे रेशनकार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा मोबदला मिळत नाही. राजीनामे दिलेल्या दुकानदाराच्या जागेवर नवीन दुकानांची अलॉटमेंट न झाल्यामुळे संबंधित दुकानदार उडवाउडवीची उत्तरे देऊन रेशन देण्यास टाळाटाळ करत आहे, तसेच बायोमेट्रिक पाॅज मशीनला बारकोड जोडून आणण्यासाठी सांगितले जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते जमीर नालबंद यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे केली आहे.

याबाबत नालबंद यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुकानदारांकडून एपीएल कार्डधारकास कार्ड लिंक केले नाही. ते वडगाव येथून बारकोड जोडून आणा, असे सांगितले जाते. कार्डधारकास वडगावला कोणताही अधिकारी सहकार्य करत नाही. त्यामुळे कार्डधारकाची दिशाभूल व वणवण होत असल्याचे जमीर नालबंद यांनी निवेदनात म्हटले आहे.

दुकानदार कार्डवरील धान्य, वस्तू व माल आमचे दुकानात येत नाही. दुकान बंद झाले, तुमचे कार्ड रद्द झालेले आहे, असे उत्तर देतात. जे कार्डधारक सदर दुकानाला बायोमेट्रिक पॉस मशीनला जोडलेले आहेत ते कार्डधारक धान्य घ्यायला आलाच तरी त्याला खराब व निकृष्ट दर्जाचा माल दाखवला जातो. त्यामुळे सदर कार्डधारक आहे तो माल घेत नाही. कार्डधारक वडगावला चकरा मारणे थांबतो व आपले रेशनकार्ड रद्द होईल या भीतीने गप्प बसतो .अशा पद्धतीने वडगांवमधील अधिकारी व दुकानदार हे संगनमताने कार्डधारकास वागणूक देत असल्यानेे रेशनकार्ड धारकांचे हाल होत असल्याकडे नालबंद यांनी लक्ष वेधले आहे.

त्याच प्रमाणे नियमित धान्य घेणाऱ्या केशरी कार्डधारकास केंद्र सरकारने जाहीर केलेला मोफत 5 किलो तांदूळ देण्यात येणारे आहे, असे दुकानदारांकडून सांगितले जाते. परंतु, या कार्डधारकापैकी किती कार्डधारक हे बायोमेट्रिक पॉस मशीनशी जोडलेले आहेत व किती कार्ड हे बायोमेट्रिक पॉस मशीनशी जोडलेले नाहीत, या बाबत कोणताही अधिकारी अथवा दुकानदार माहिती देत नाही. पात्र व अपात्र कार्डधारकांची यादी दुकानदारास द्यावी व त्या दर्शनी भागात भागात दिसेल अशा ठिकाणी लावण्याची दुकानदारांना सांगावे, अशी मागणी नालबंद यांनी केली आहे.

रेशन दुकानदारांचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वाटपात पारदर्शकता येण्यासाठी, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह समिती नेमावी, अशी विनंतीही नालबंद यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.