Talegaon Dabhade : उसतोडणीचे काम लवकर सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- उर्से परिसरात ऊस तोडणीच्या कामाला उशीर होत असल्याने उसतोड लवकर करावी अशी मागणी करणारे निवेदन उर्से येथील शेतकऱ्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला दिले आहे.

पवन मावळातील अनेक गावांमध्ये अद्याप उसतोडणी सुरु न झाल्याने उसाला तुरे लागले आहेत. उसाचे वय वाढत चालल्यामुळे उसाचे वजन कमी होत चालले आहे. या वर्षी पाऊस चांगला पडून व पीक चांगले येऊन सुद्धा वेळेत तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जर लवकर उसतोडणी होत नसेल तर पुढील वर्षी उस पिक घ्यावे कि नाही याबाबत विचार करण्याची वेळ आली असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

कारखान्याचे कार्यकारी संचालक हे शेतकऱ्यांना वेळेवर उसतोडणी करण्याचे फक्त आश्वासन देत आहेत परंतु याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष धामणकर यांनी सांगितले. सुभाष धामणकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पवन मावळातील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत मधुकर सावंत, बाळासाहेब धामणकर, सोपान गायकवाड, रामदास वाळूंज, बाळासाहेब पिसाळ, अर्जुन कारके, शंकर धामणकर, बाळासाहेब बराटे आदी शेतकरी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.