BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा रविवारी सत्कार

एमपीसी न्यूज- समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे, रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी आणि मावळ नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त तळेगाव दाभाडे आणि परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत राहून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 10) सायंकाळी साडेपाच वाजता तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ईशा मध्ये होणार आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष खांडगे यांनी ही माहिती दिली.

या कार्यक्रमात मावळच्या नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांना राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला पुरस्काराने तर महाराष्ट्र राज्य कर उपायुक्त जाई वाकचौरे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त डाॅ अभय टिळक असणार आहेत. पुरस्कार वितरण राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त व लोककला अकॅडमी मुंबई विद्यापीठाचे संस्थापक प्रा डाॅ प्रकाश खांडगे यांचे हस्ते होणार आहे.

याच कार्यक्रमात समाजातील शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक, साहित्यिक, सांप्रदायिक, कृषी/उद्योग क्षेत्रात अविरतपणे कार्य करणाऱ्या शालिनी झगडे, श्रीमती सुलोचना खांडगे, वंदना खांडगे, उषा धारणे, ज्योती मुंगी, श्रीमती शांताबाई निळकंठ अशा ज्येष्ठ महिलांना कर्तृत्ववान ज्येष्ठ महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गौरी उदय महिला बचत गटास गौरवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख मंजुळा हादिमणी, श्रीमती कुसुमताई वाळुंज व अक्षता कोळवणकर यांनी केले आहे.

.