Talegaon Dabhade: ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमातून सुनील आण्णा शेळके युवा मंचच्या वतीने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन केलेले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्यांच्या पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच सर्वसामान्य गरजू कुटुंबांना मदत व्हावी, सामाजिक बांधिलकी, माणुसकीचे नाते टिकावे या सेवाभावी वृत्तीने आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचच्या वतीने ‘मदत नव्‍हे कर्तव्य’ हा उपक्रम राबविला जात आहे. गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा संच पुरविण्यात येत आहे.

मदत नव्‍हे कर्तव्य या उपक्रमाअंतर्गत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा संच आज, गुरुवारी (दि. 9) तळेगाव दाभाडे शहरातील सर्व भागात देण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, चंद्रभान खळदे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, मंगल भेगडे, संगीता शेळके आदी उपस्थित होते.

परिसरातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत संच पोहोचवण्याची जबाबदारी आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचचे सभासद आणि सार्वजनिक मंडळे, सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे सभासद यांनी घेतली आहे. सर्व सदस्य गरजू व्यक्तींच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना मदत करणार आहेत. यातून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मोठी मदत होणार आहे.

आमदार सुनील शेळके म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. युवा मंचच्या माध्यमातून गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचवली जाईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.