BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : सुनील शेळके यांच्या गाव भेट दौऱ्याने ढवळून निघणार मावळचे राजकारण!

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी आजपासून (शनिवार) ‘गाव भेट दौरा’ सुरू केल्यामुळे मावळ तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

मावळचे विद्यमान आमदार संजय तथा बाळा भेगडे यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मावळात भाजपतर्फे त्यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच शेळके यांनी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भेगडे यांच्यापुढे पक्षांतर्गतच मोठे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.

  • सुनील शेळके यांनी गेल्या पाच वर्षांत मावळ तालुक्यात विविध कार्यक्रम आणि विकासकामांच्या माध्यमातून गावोगाव संपर्क वाढवत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्यांनी भाजपचा झेंडा घेऊन गावभेट दौरा सुरू केला आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी शिरगाव येथून या दौऱ्यास प्रारंभ केला. पहिल्या टप्प्यात तीन ते दहा ऑगस्ट दरम्यान शेळके हे पवन मावळातील प्रत्येक गावातील मतदारांशी पुन्हा संवाद साधणार आहेत. ग्रामदैवताचे दर्शन व ज्येष्ठांचा आशीर्वाद असे या गाव भेटीची स्वरूप आहे.

आतापर्यंत भाजपने मावळात कोणत्याही आमदाराला तिसऱ्यांदा संधी दिलेली नाही. विद्यमान आमदार बाळा भेगडे हे दोन वेळा आमदार झाले असून पक्षाने त्यांना राज्यमंत्री म्हणूनही संधी देऊन पुरेपूर न्याय दिलेला आहे. त्यामुळे पक्षाने आगामी निवडणुकीत शेळके यांच्या रुपाने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी शेळके समर्थकांची जोरदार मागणी आहे. शेळके यांचे कार्य, कामाचा झपाटा आणि लोकप्रियता लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी त्यांनाच उमेदवारी देतील, असा दावा शेळके समर्थक करीत आहेत.

  • बाळा भेगडे यांनी राज्यमंत्री झाल्यानंतर तालुक्यातील बऱ्याच गावांना भेटी दिल्या. त्या पाठोपाठ शेळके यांनीही गाव भेट दौरा काढून तालुका ढवळून काढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच तालुक्यात भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपमधील उमेदवारीच्या रस्सीखेचीत शेळके पूर्ण ताकदीनिशी उतरल्याने त्यात कोणाची सरशी होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
HB_POST_END_FTR-A2

.