Talegaon Dabhade: मावळ हा ‘आदर्श तालुका’ बनविण्यासाठी हवी आहे सर्वांची साथ -सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळ हा आदर्श तालुका बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी गेली दहा वर्षे आहोरात्र प्रयत्न करीत आहे. आदर्श तालुक्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मला सर्वांचे आशीर्वाद आणि साथ हवी आहे. मावळात इतिहास घडविण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी केले आहे.

मतदानाला अवघे दोन दिवस उरलेले असताना शेळके यांनी ‘एमपीसी न्यूज’ला प्रदीर्घ मुलाखत देत त्यांची भूमिका स्पष्ट केली. ही निवडणूक सुनील शेळकेची राहिली नसून मावळातील जनतेची झाली आहे. त्यामुळे आता मावळात परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता शेळके म्हणाले की, आयुष्यात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात तर कधी परिस्थिती निर्णय घ्यायला लावते. आपण सर्व जाणता की, शेळके कुटुंबाने सुरू केळेला समाजसेवेचा वारसा मी आजही पुढे सुरू ठेवला आहे आणि हे केवळ तुमच्या आशीर्वादामुळेच. गेल्या काही दिवसांत खूप बदल घडले आहेत आणि त्यामुळेच मला एक धाडसी निर्णय घ्यावा लागला. तो निर्णय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझा प्रवेश. जवळपास एक दशक समाजसेवा करून जे काही मी साध्य केले आहे, त्याची साधी पोह्पावतीही मिळत नसेल तर मी तो आपल्या सगळ्यांचा आणि शेळके कुटुंबीयांचा अपमान समजतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या कामाची दखल घेऊन मला पक्षाची उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो.

आपल्या घराण्यातील चार पिढ्या जनसंघ व भाजपशी एकनिष्ठ असताना पक्षांतराचा निर्णय घेणे अवघड वाटले नाही का?, या प्रश्नावर शेळके म्हणाले, मूळात आपण तालुक्यात केलेल्या कामाच्या जोरावर मला भाजपकडून नक्की उमेदवारी मिळेल, असा विश्वास मला शेवटपर्यंत वाटत होता, त्यामुळे भाजपने उमेदवारी नाकारणे हे माझ्यासाठी धक्कादायक होते. माझे काय चुकले?, हे देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले नाही. भाजप सोडण्याचा निर्णय हा आपल्या आयुष्यातला सर्वात कटु निर्णय होता, पण परिस्थितीमुळे तो घेणे भाग पडले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, केशवरावजी वाडेकर यांची उणीव नक्कीच जाणवली.

शेळके कुटुंबाची एकनिष्ठा निष्फळ ठरली
आमच्या कुटुंबाचा राजकीय वारसा देखील समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या कित्येक पिढ्या आमचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ व नंतर भाजपशी एकनिष्ठ होते. माझ्या पणजी कै. तान्हाबाई राणबा शेळके जनसंघाच्या उमेदवार म्हणून तळेगांव शहराच्या पहिल्या बिनविरोध महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आजोबा स्व. बाळासाहेब बाबुराव शेळके यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरसेवक व नगराध्यक्षपदही भूषविले. माझे मोठे काका भ्रीमाजी बाजीराव शेळके हे 1991 ते 1995 या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवकपदी प्रचड मताधिक्यांनी निवडून आले होते. माझे दिवगंत मोठे बंधू सचिन बाळासाहेब शेळके यांनी 2006 ते 2012 या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवकपद भूषविले. तसेच 2010 ते 2011 या काळात नगराध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. पुढे भाजपच्या शहराध्यक्षपदाची धुराही त्यांनी समर्थपणे पेलली, अशी माहिती शेळके यांनी दिली.

स्वतःच्या राजकीय प्रवासाबाबतही शेळके यांनी सांगितले की, मी 2004 पासून भारतीय जनता पक्षाचा क्रियाशील तरुण सदस्य म्हणून कार्यरत झालो. 2011 मध्ये झालेल्या तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आलो. तसेच पॅनलमधील इतर तीनही उमेदवारांना निवडून आणण्यात मोलाचे योगदान दिले. भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मला मिळाली. 2016 मध्ये तळेगांव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, जनसेवा विकास समिती, आर. पी. आय. व मनसे या महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. आठ नगरसेवक व नगराध्यक्ष यांना निवडून आणण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. नगरपरिषदेच्या स्थायी समितीत कुटुंब व बालकल्याण समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाली. 2012 पासून विविध पदांवर कार्यरत राहून अनेक विकासकामे मार्गी लावली. लोकसेवेचे ध्येय घेऊन कार्यरत राहिल्याने उपनगराध्यक्ष तसेच पाणीपुरवठा समिती सभापती झालो. 2011 पासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध पदांवर कार्यरत राहून विविध विकासकामे मार्गी लावली. मावळातील अनेक निष्ठावंत व वरिष्ठ कार्यकर्त्यांसमवेत एकमताने व एकदिलाने वाटचाल केली. गेल्या पाच वर्षात तालुका पातळीवर कामाचा विस्तार करून पक्षवाढीसाठी झोकून देऊन प्रयत्न केले. एवढे काम करूनही पक्षनेतृत्वाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने भाजपमधील बहुतांश कार्यकर्ते व भाजपला मानणारा मोठा मतदारवर्गही नाराज झाला असून आज तो आपल्या पाठीशी आहे.

खूप काही केलंय, खूप करायचंय…
‘खूप काही केलंय, खूप करायचंय…’ असं सांगत सुनील शेळके यांनी गेल्या पाच वर्षात मावळ तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांचा आणि उपक्रमांचा अहवालच समोर ठेवला. आदर्श ग्रामविकास योजनेअंतर्गत, अतिशय दुर्गम पर्वतराजीतील पवन मावळ परिसरातील ‘डोणे” आणि नाणे मावळ परिसरातील “थोरण”, ही गावे संपूर्ण विकासासाठी दत्तक घेतली. कोणताही राजकीय स्वार्थ न बाळगता, लोकसहभागातून गावांचा विकास झाला पाहिजे, या हेतूने प्रेरित होऊन कोणताही शासकीय निधी न वापरता लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानतर्फे केवळ नऊ महिन्यांमध्ये डोणे गावाचा अक्षरश: कायापालट झाला आहे. ग्रामसुधार योजनेच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, डोणे गाव दत्तक घेऊन अवघ्या नऊ महिन्यांत गावातील विकासकामे पूर्ण झाली. एकेकाळी मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या “थोरण’ गावाचा कायापालट झाला असून आता गावाची स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल सुरू झाली आहे. ग्रामस्थांचा सहभाग आणि श्रमदानातून आपण थोरण गावाचे रूपच पालटले आहे. स्वागत कमान, रस्ते काँक्रिटीकरण, अंगणवाडी खोली, सार्वजनिक गोठा, पाण्याची टाकी, मंदिराचे रंगकाम, सभामंडपाचे बांधकाम, शाळेचे नूतनीकरण, संगणकीकरण व्यवस्था, क्रीडांगणांची व्यवस्था, संगणकीकृत ग्रामपंचायत, सार्वजनिक स्वच्छतागृहे इत्यादी विकासकामे केली गेली, असे शेळके यांनी सांगितले.

पावसाचे पाणी तुंबून रस्त्यावर घाण येऊ नये व परिसर स्वच्छ रहावा यासाठी स्वखर्चाने गटारी बांधल्या. नगरपालिकेच्या मंजूर नकाशानुसार वसाहती अंतर्गत मोकळ्या जागेवर लोकवर्गणी व स्वखर्चाने कडोलकर कॉलनीत श्री गणेश मंदिर, म्हाळसकरवाडी येथे श्री गणेश मंदिर व शिक्षक सोसायटी येथे श्री दत्त मंदिराची स्थापना करण्यात आली, तसेच श्री संत निरंकारी बाबा यांचे मंदिरासाठी कडोलकर कॉलनीत जागा उपलब्ध करुन दिली. साखळी चोऱयांचे प्रमाण वाढल्याने नगरपरिषदेशी चर्चा करुन जवळपास सगळ्या रस्त्यांवर दिव्यांची सोय तसेच काही भागात स्वखर्चाने सीसीटीव्ही बसविले, अशी माहिती त्यांनी दिली.

गावागावात पोहोचवली विकासगंगा
शेळके म्हणाले की, देहूरोड येथे काँक्रिटीकरणाचे काम केले. सोमवडी येथील मंदिर परिसरात संरक्षण भिंत व अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण केले. तळेगाव दाभाडे लायन्स क्लबचे दगडी व जाळीचे कंपाऊंड, क्रिकेट ग्राऊड, व्यायाम शाळेस आर्थिक सहाय्य केले. सह्याद्री इंग्लिश स्कूल उभारणीत संस्थापक व संचालक पदावर असताना गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला. तसेच शाळेचे मैदान व कंपाऊंड स्वखर्चाने बांधून दिले. मावळ तालुक्‍यातील अनेक होतकरू तरूणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व आर्थिक मदतही केली. मावळ तालुक्‍यातील क्रशर व्यावसायिकांना एकत्र घेऊन आंबी ते आंबळे ह्या गावातील पाच कि.मी. रस्त्याचे काम स्वखर्चातून पूर्ण केले. तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 25 लाखांच्या देणगीव्दारे भरीव आर्थिक सहाय्य केले.

धार्मिक कार्यक्रमांना सदैव साथ
जीवन विद्या मिशन मुंबई कै. वामनराव पे यांचे चिरंजीव श्री प्रल्हादराव पै यांचा 16 डिसेंबर 2017 रोजी “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या विषयावर तीन दिवसीय प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदरील कार्यक्रमाला मावळ व आसपासच्या भागातील पंधरा हजार नागरिकांची उपस्थिती होती. मावळला समृद्ध वारकरी परंपरा लाभली आहे. आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी,यासाठी भाविकांना मोफत पाणीपुरवठा व आरोग्याची देखभाल करण्यासाठी रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येते. आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या मावळ तालुक्‍यातील सर्व दिंड्यांना सतरंजी वाटप करण्यात आले, अशी माहिती शेळके यांनी दिली. मावळ तालुक्यात सुख-समृद्धी नांदावी म्हणून 1,111 दाम्पत्यांचा सहभाग असलेल्या सामूहिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते, असे शेळके यांनी सांगितले.

गरजू रुग्णांना स्वखर्चाने मदत
माणुसकीच्या दृष्टीकोनातून ओम मोरे या विद्यार्थ्याच्या मेंदू व मणक्याचे अवघड ऑपरेशन आपण स्व-खर्चातून करून दिले. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या मुलांच्या पुढील शिक्षणाचा भार उचलला. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळ तालुक्‍यातील पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश दिले. संगणक साक्षरता अभियानाअंतर्गत मावळ तालुक्‍यातील असंख्य विद्यार्थी – विद्यार्थीनींना मोफत संगणक प्रशिक्षण व स्मार्ट कॉम्प्युटर एक्सपर्ट कोर्स चे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, अशी माहिती शेळके यांनी दिली.

‘माणुसकी’ आणि ‘आपुलकी’
सुनील शं. शेळके प्रतिष्ठान आणि अभंग प्रतिष्ठान श्री क्षेत्र देहू यांच्या वतीने कु. हर्षदा राहुल सोनवणे या मुलीला स्वखर्चाने घर बांधून दिले. मावळ परिसरातील तसेच देहू गावातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ‘माणुसकी’ या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. माय मावळ फाऊंडेशन तसेच समस्त चांदखेड ग्रामस्थ यांच्या सयुक्त विद्यमाने श्रीमती रेश्मा अहमद शेख या गरीब महिलेसाठी सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून नवीन घर बांधून दिले. रमजान ईदच्या निमित्ताने ‘अपनापन * ही वास्तू त्यांना सुपूर्द करण्यात आली, याकडे शेळके यांनी लक्ष वेधले.

आरोग्य शिबिरांचा हजारो नागरिकांना लाभ
वाढदिवसानिमित्त 18 ऑक्टोबर 2017 रोजी पवना हॉस्पिटलच्या सहकार्याने पवनानगर येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरांमध्ये 47 रुग्णांची मोफत अँन्जिओग्राफी, एक हजार रुग्णांना मोफत चष्मे वाटप व चारशे रुग्णांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान व ‘माय माउली फाऊडेशन’तर्फे मावळ तालुक्‍यातील टाकवे येथे मोफत आरोग्य तपासणी व शरत्रक्रिया शिबिराचे आयोजन केळे. या आरोग्य शिबिरात १० हजार नागरिकांची विनामूल्य तपासणी तसेच विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान व माय माउली फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन ८ जानेवारी २०१९ रोजी कामशेत येथे करण्यात आले. शिबिरात २५०० ते ३००० जणांवर वेगवेगळ्या आजाराच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना औषधे, गोळ्या, चष्मे, श्रवणयंत्रे, वॉकर, व्हील चेअर्स, जयपूर फूट इ. चे मोफत वाटप करण्यात आले. तसेच कामशेत परिसरातील १५ हजार जणांची मोफत विनामूल्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, अशी माहिती शेळके यांनी दिली.

दीड हजार विद्यार्थ्यांना मोफत सायकलवाटप
सुनीलआण्णा म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला देऊन गती साधली शैक्षणिक प्रगती. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानतर्फे मावळ तालुक्‍यातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.

गेल्या पाच वर्षांपासून मावळ तालुक्‍यात जागतिक अंध अपंग दिन साजरा करण्यात येतो. हे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व भोजनाचा कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मावळमधील दुर्गम भागातील वाड्या, वस्त्यावरील दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी घर ते परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवासी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेतून माय मावळ फाउंडेशनच्या वतीने “आयडियल १०” हे अॅप विद्यार्थ्यांना मोफत डाउनलोड करून देण्यात आले. सुनील शंकरराव शेळके फाऊंडेशनतर्फे मावळ तालुका आंतरशालेय मॅरथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महिला सक्षमीकरणाला चालना
सत्यमेव स्वयं सहायता महिला बचत गटामार्फत मावळमधील गरीब महिलांचे संघटन करून, जवळपास 15 हजार महिलांच्या बचतगटाची स्थापना केली. तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन, रोजगार तसेच बाजारपेठ उपलब्ध करून दिली. महिलांना मोफत गॅस कनेक्शन व सिलिंडर वाटप. ढदिवसानिमित्त 18 ऑक्टोबर 2017 रोजी पवना हॉस्पिटलच्या सहकार्याने पवनानगर येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये 47 रुग्णांची मोफत अँन्जिओग्राफी, एक हजार रुग्णांना मोफत चष्मे वाटप व चारशे रुग्णांना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. मावळ तालुक्‍यातील महिलांना तीन महिने मोफत शिवणकला व फॅशन डिझाईनिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. साधारणतः 12 हजार महिलांनी या संधीचा लाभ घेतला. तसेच मावळ तालुक्‍यातील असंख्य महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “खेळ रंगला पैठणीचा’ आणि ‘सौभाग्यवती ‘ या महिलांसाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असा आढावा सुनीलआण्णांनी सादर केला.

शिवजयंती – भीमजयंतीचा लोकोत्सव
सामाजिक सलोखा राखण्यासाठी व समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीने कामशेत येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये **शिंदेशाही बाणा” हा लोकगीतांचा अप्रतीम कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास समाजातील सर्वस्तरातील 30 हजार नागरिकांनी हजेरी लावली. शिवजयंती, बुद्धजयंती, ईद, गणेशोत्सव अशा सण उत्सवांमध्ये सहभागी होऊन मावळ भागात सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचे काम केले, असे शेळके यांनी सांगितले.

अखंड हरीनाम सप्ताह
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान व माय माउली ज्येष्ठ नागरिक संघातर्फे “अखंड हरीनाम सप्ताहाचे ’26 डिसेंबर 2018 ते 3 जानेवारी 2019 या कालावधीत कामशेत येथे आयोजन करण्यात आले. या सप्ताहामध्ये प्रवचनकार, कीर्तनकार, वारकरी संप्रदांयातील मान्यवर यांनी आपल्या परीने सेवा समर्पित केली. सप्ताहामध्ये विठ्ठल परिवाराची स्थापना करण्यात आली. वरील कालावधीत साधारण 60 हजार भक्त मंडळींनी हा सोहळा अनुभवला. शेवटच्या दिवशी श्री हरिपाठ, श्री ज्ञानेश्‍वरी, श्री तुकाराम गाथा या ग्रंथांची भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ
माय माउली ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ नागरिकासाठी श्रीक्षेत्र शिवथरघळ, श्री क्षेत्र चांगवटेश्वर, श्री क्षेत्र शनिशिंगणापू| या ठिकाणी एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले.माय माउली ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 28 मार्च 2017 रोजी गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत हत्ती, उंट, घोडेस्वार, वारकरी दिंडी पथक तसेच महाराष्ट्रीय पारंपरिक साड्या व भगवे फेटे परिधान केलेल्या दोन हजार ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी काढलेली ही पहिलीच भव्य शोभायात्रा होती.माय माउली ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना पावसाळ्यात मोफत छत्री वाटप करण्यात आले, असे शेळके यांनी सांगितले.

जनहितासाठी आंदोलने आणि मोर्चाचे नेतृत्व
जनहितासाठी केलेल्या आंदोलनांची माहिती देताना शेळके म्हणाले की, पवना बंद जलवाहिनीव्दारे पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी वळविण्याविरुध्द झालेल्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन जलवाहिनीचे काम बंद करण्यासाठी शासनाला भाग पाडले. तसेच आंदोलनकर्त्यावरील गोळीबार खटल्यांमध्ये आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून खटले चालवण्यास मदत व गोळीबारात मृत्यू पावलेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व सहकार्य केले. तळेगांव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने चतुर्थ वार्षिक कर आकारणीद्वारे नागरिकांवर अतिरिक्‍त जिझिया कर लादला होता. या बेकायदेशीर करवाढीविरोधात आंदोलन करुन तळेगांव मधील 10 हजार नागरिकांची करवाढीतून मुक्तता केली. पिंपरी चिंचवड शहरांतील अनधिकृत बांधकामाच्या समस्येविरुध्द शासनाला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर काढलेल्या मोर्चात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला. शासनाच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष करुन परिवहन खात्यातील अधिकारी-कर्मचारी हे मनमानी कारभाराव्दारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याबद्दल पुणे जिल्हा वाहतूकदार संघटना व पुणे जिल्हा स्टोन क्रशर संघटनेतर्फे सुमारे आठ ते दहा दिवस आंदोलनामध्ये वाहने बंद ठेवण्यात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन यांच्यासमवेत चर्चा व आवश्यक त्या कार्यवाहीचे आश्वासन मिळविल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तळेगांव नगरपरिषदेतील सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक, पक्षपातीपणा यांचा तळेगावांतील विकासकामातील भ्रष्टाचार विरोधी पक्षनेता या नात्याने उघडकीस आणून शासनाकडे तक्रार केली. तळेगांव दाभाडे नगरपरिषदेकडून रस्ता रुंदीकरणासाठी ‘वृक्षतोडी’विरुध्द विरोधी पक्षनेता म्हणून जोरदार निदर्शने व मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे शिष्टमंडळासमवेत तक्रार केली. पर्यावरणपूरक धोरणानुसार वृक्षांची मावळ तालुक्‍यात लागवड व संगोपन केले.

मावळ तालुक्‍यातील एल अँण्ड टी, समुद्रा कॉलेज, आयआरबी, तसेच अनेक इतर कंपन्यांतील कामगार हितसंबंधित लढ्यासाठी कंपनी प्रशासनाविरोधात कामगारांना पाठिंबा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगांव-चाकण मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या वेळकाढूपणाविरुध्द सदरील स्टेशन चौकामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रास्ता रोको ठिय्या आंदोलन केले. तळेगांव शहरातील कचरा योग्यरीत्या गोळा केला जात नसल्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊन साथीच्या रोगाचा प्रादूर्भाव होत होता, तसेच अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा व खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताच्या प्रश्नांबद्दल नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही सत्ताधाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत होते. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा काढून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेकडून कार्यवाही झाली, असे त्यांनी सांगितले.

सुनील शेळके काय आहे?, सुनील शेळकेचे काम आहे?, हे मावळातील जनतेला माहीत आहे. सत्ता नसताना आपण तालुक्यात विकासाची कामे केली. मावळच्या विकासासाठी जनतेने यावेळी आपल्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. तालुक्यात प्रचारासाठी फिरताना जनसामान्यांचे प्रेम अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र महाआघाडीचे तालुक्यातील नेते व कार्यकर्ते एवढेच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षातील माझे हितचिंतक खूप मेहनत घेत आहेत. सर्वांच्या पाठबळामुळे आपल्याला पुढील कामासाठी नवी उभारी मिळाली आहे. आपला विजय निश्चित असून किती जास्त मताधिक्य मिळते, एवढीच उत्सुकता बाकी आहे, असा विश्वास शेळके यांनी शेवटी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.