Talegaon Dabhade :गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुनील शेळके यांचा ‘प्लॅस्टिकमुक्त मावळ’साठी पुढाकार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी पर्यावरण रक्षणासाठी ‘प्लॅस्टिकमुक्त मावळ’ अभियानासाठी पुढाकार घेतला असून गणेशोत्सावातील स्वागत कमानींवरील संदेशाच्या माध्यमातून ते जनजागृती करीत आहेत.

‘प्लॅस्टिकचा वापर टाळा, चला निर्धार करूया… प्लॅस्टिकमुक्त मावळ करूया’ असा संदेश असलेल्या 24 स्वागत कमानी तळेगावमधील प्रमुख गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने उभारल्या आहेत. प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन या स्वागत कमानींच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाची कधीही न भरून येणारे नुकसान होत असते. अजाणतेपणाने प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे प्राण्यांनाही आरोग्याचे विकार होत आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या मावळ तालुक्यातील निसर्ग अबाधित राहण्यासाठी प्लॅस्टिकमुक्त मावळ अभियान हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा, यासाठी विविध मार्गांनी जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती सुनील शेळके यांनी दिली.

तळेगावातील ज्वालामुखी मिञ मंडळ, जय बजरंग मंडळ, शिवगर्जना मंडळ, शिवशकंर मंडळ, शिवराष्ट्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, अमर खडकेश्वर मित्र मंडळ, गणेश तरुण मंडळ, कालिका माता मित्र मंडळ, राष्ट्रतेज तरुण मंडळ, शाळा चौक मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, शेतकरी मंडळ, बनेश्वर मित्र मंडळ, उमाबाई दाभाडे मंडळ, शिवक्रांती तरुण मंडळ, पाच पांडव मंडळ, चावडी चौक मंडळ, स्वराज मिञ मंडळ, एकविरा मित्र मंडळ, अमरहिंद मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, एकता मंडळ या प्रमुख मंडळांच्या गणपतीसमोर भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानींवर प्लॅस्टिकमुक्त मावळ करुयाचा संदेश देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.