Talegaon Dabhade : गावभेट दौऱ्यात सुनील शेळके यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा प्रत्यय

एमपीसी न्यूज – भरपावसात तासन् तास प्रतीक्षा, मध्यरात्रीपर्यंतची जागरणं, राजकीय मतभेद बाजूला ठेवून स्वागतासाठी गावोगाव होणारी गर्दी, वाजंत्री, ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी यासह शानदार मिरवणुका काढून झालेले उत्स्फूर्त स्वागत या सर्वांमधून मावळात नव्याने उदयाला आलेले नेतृत्व सुनील शेळके यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा प्रत्यय आला.

मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी निवडणुकीच्या तोंडावर गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. या दौऱ्याला मावळवासीयांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल भाजप पक्षश्रेष्ठींनाही घ्यावी लागली.

गेल्या पाच वर्षांपासून विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून शेळके हे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहेत. नागरिकांच्या नेमक्या गरजा ओळखून लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या शेळके यांनी अल्पावधीतच मावळच्या जनतेच्या हृदयात स्थान मिळवले. गावोगाव फिरून शेळके यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना गाव भेट दौऱ्यात लोकांच्या प्रेमाच्या रुपाने मिळली.

कार्यक्रमासाठी माणसे जमविणे, गर्दी गोळा करणे, हे दिवसेंदिवस जिकिरीचे होत चाललेले असताना केवळ दौऱ्याचे वेळापत्रक पाहून गावोगाव लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वखर्चाने केलेली शेळके यांच्या स्वागताची तयारी खूप काही सांगून जाते. सुनीलआण्णा गावात येणार म्हणून तासन् तास त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणारी माणसे त्यांच्या कृतीतून प्रेम व्यक्त करीत होती. रात्री कितीही वाजले तरी आमच्या गावात आलेच पाहिजे, असा आग्रह धरत होती.

वाजंत्री, ढोल-ताशांचा दणदणाट, फटाक्यांचा धुमधडाका, रांगोळ्यांच्या पायघड्या, जीप, बैलगाडी, घोडा यावरून अाण्णांची मिरवणूक, ठिकठिकाणी होणारे औक्षण, मिरवणुकीत सहभागी होणारे पूर्ण गाव, लहान मुले, युवक व महिलांचा लक्षणीय सहभाग यामुळे गावाला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त होत होते. सुनील आण्णा आल्यावर त्यांच्याशी हस्तांदोलन करायला, बोलायला, त्यांच्या बरोबर ‘सेल्फी’ घ्यायला, त्यांचे भाषण ऐकायला एकच झुंबड उडत होती. प्रत्येक गावात ज्येष्ठांकडून आशीर्वादाचा वर्षाव होत होता.

मावळच्या जनतेने भरभरून दिलेले प्रेम आणि आशीर्वाद पुढील वाटचालीसाठी बळ देणारे आहे, अशा भावना शेळके यांनी व्यक्त केल्या. या प्रेमाबरोबरच मावळच्या जनतेच्या अपेक्षा, स्वप्नं पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी देखील आपण स्वीकारत आहोत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.