Talegaon Dabhade : शहराच्या विकासासाठी व निवडणूक टाळण्यासाठीच जनसेवा विकास समितीच्या उमेदवाराला पाठिंबा- गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी, शहरात खेळीमेळीचे निकोप वातावरण राहावे व निवडणूक टाळावी, या एकमेव सद्भावनेने भारतीय जनता पक्षाने जनसेवा विकास समितीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे स्पष्टीकरण भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना केले.

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून (2016) भारतीय जनता पक्ष आणि जनसेवा विकास समिती यांची निवडणूकपूर्व युती आहे. पोटनिवडणुकीतील उमेदवार निखिल भगत हे मूळचे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. अत्यंत स्वच्छ चारित्र्याच्या या कार्यकर्त्याला बिनविरोध निवडून द्यावे, अशी आमचीही इच्छा होती.

भाजपच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देण्यात काही मंडळींचा विरोध होता. त्यामुळे निखिल भगत यांनी जनसेवा विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवावी, असा निर्णय सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांच्या बैठकीत झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली. सर्वानुमते झालेल्या निर्णयाचे सर्व पक्षांनी स्वागत केले, असेही भेगडे यांनी सांगितले.

  • शहरात निकोप वातावरण निर्माण करण्याचा प्रयोग – किशोर आवारे
    तळेगाव शहराचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी तसेच शहरातील वातावरण निकोप व खेळीमेळीचे राहावे यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी घेतला आहे, अशी माहिती जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी दिली. जनसेवा विकास समितीचे उमेदवार निखिल भगत यांना पाठिंबा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपनेही आम्हाला सहकार्य केले. त्याबद्दल आम्ही भाजपच्या नेत्यांचेही जाहीर मानले आहेत. या विषयात राजकारण न आणता शहरातील वातारण चांगले ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आवारे यांनी केले.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.