Talegaon Dabhade : स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता हाच निकष- रामदास काकडे

स्वाती दाभाडे हिचा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे सत्कार

एमपीसी न्यूज- आगामी काळ स्पर्धेचा असून गुणवत्ता हाच निकष असणार आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा उपयोग करून स्वतःला सिद्ध करावे. असे मार्गदर्शन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेत राज्यात मुलींच्यात प्रथम आलेल्या स्वाती दाभाडे हिचा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला, त्यावेळी काकडे बोलत होते.

यावेळी स्वातीचे वडील किसन दाभाडे, आई लक्ष्मीबाई दाभाडे, संस्थेचे उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, उद्योजक संजय साने, निरुपा कानिटकर, विलास काळोखे, सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान, प्राचार्य डाॅ संभाजी मलघे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वाती दाभाडे ही इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वातीला सन्मानित करण्यात आले. तिच्या आई आणि वडिलांचा सत्कार गोरखभाऊ काळोखे यांच्या हस्ते करण्यात आला.

रामदास काकडे म्हणाले, “मनात शिकण्याची उर्मी आणि जिद्द असेल तर आकाशाला गवसणी घालता येते हे स्वाती दाभाडे यांनी दाखवून दिले आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ध्येय कसे गाठावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंद्रायणी महाविद्यालयाची ही सुकन्या आहे. स्वाती, तिची आई आणि वडील यांचे एकत्रित असलेले छायाचित्र महाविद्यालयाच्या ग्रंथालयात लावणार आहोत. जेणेकरून अन्य विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल. स्वातीने यापुढेही अधिक उच्च पदावर जाण्याचा प्रयत्न करत राहावे” अशी अपेक्षा काकडे यांनी व्यक्त केली. शैक्षणिक क्षेत्रात आज स्पर्धा वाढली असली तरी पालक व विद्यालयाच्या पातळीवर सुविधा पुरविल्या जात आहेत याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शन व अभ्यासासाठी सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. असे त्यांनी सांगितले.

अर्चना घारे म्हणाल्या, “स्वाती दाभाडेने राज्य सेवा परीक्षेत जे यश मिळवले आहे ते तिच्या जिद्द आणि चिकाटीचे फळ आहे. कोणत्याही अडचणींचा बाऊ न करता त्यातून मार्ग काढून मिळवलेले यश मुलींसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल,गुणवंत विद्यार्थी हीच महाविद्यालयाची खरी संपत्ती आहे” असे त्या म्हणाल्या.

सत्काराला उत्तर देताना स्वाती दाभाडे म्हणाल्या, “अभ्यासाबरोबरच प्रत्येक उपक्रमात सहभागी झाल्याने व्यक्तिमत्वाचा झालेला विकास मुलाखतीत उपयोगी पडला आणि तिथेच मला सर्वाधिक गुण मिळाल्याने मुलींच्यात प्रथम येण्याचा मान मिळाला. ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार असून या महाविद्यालयाचे नाव अधिक उंचीवर नेणार आहे”

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. प्रा. के. बी. अडसूळ यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.