Talegaon Dabhade: ‘दबंग 3’मध्ये साधुसंतांचा अपमान करणाऱ्या सलमानवर कारवाई करा -प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज- ‘दबंग 3’ या आगामी चित्रपटात मुख्य अभिनेता सलमान खान याने साधुसंतांचा अपमान केलेला असून त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच चित्रपटांमध्ये हिंदू धर्म, संस्कृती व ऋषीमुनींची वारंवार होणारी थट्टा व अपमान थांबवण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला देण्यात यावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समिती पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

हिंदू देव-देवता, साधू संत यांच्याविषयी विनोदी प्रसंग व संवाद याद्वारे थट्टा व अपमान करणाऱ्या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व संबंधित कलाकार यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी व त्या विरुद्ध कायदे करावेत, असे प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

सलमान खानच्या चित्रपटातील अशा आक्षेपार्ह दृष्यांमुळे हिंदू लोकांची मने दुखावली जातात व त्यामुळे पुन्हा एकदा असेच आक्षेपार्ह कृत्य त्याच्याकडून झाले आहे. तरी दबंग 3 या चित्रपटातून आक्षेपार्ह दृष्ये काढून टाकावीत तसेच हिंदू धर्माचा व साधुसंतांचा कळत-नकळत अपमान केल्याबद्दल अभिनेता सलमान खान याने जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केली आहे.

चित्रपट-नाटकांमध्ये कोणत्याही धर्माचा अपमान व अपप्रचार होऊ नये तसेच त्या धर्माची संस्कृती जपली जावी म्हणून सेन्सॉर बोर्डामध्ये एक समिती नेमावी. त्यामुळे कळत-नकळत होणारे धर्माचे अपमान थांबतील व लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी सूचना निवेदनात करण्यात आली आहे.

सर्वधर्मसमभाव या तत्वावर हे शासन चालविले जाणार असल्याने हिंदू धर्मीयांच्या भावनांचाही योग्य आदर राखला जाण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबंधितांना सक्त ताकीद द्यावी तसेच कायद्यात आवश्यक ते बदल करावेत, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.