Talegaon Dabhade: कोरोनाबाधित नर्सच्या संपर्कातील 28 जण क्वारंटाईन, शहरात कडकडीत बंद

Talegaon Dabhade: 28 people in contact with corona-infected nurse quarantined

तळेगाव दाभाडे –  तळेगावातील कोरोनाबाधित  महिला परिचारिकेस  पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून  तिच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना तळेगावातील शासकीय केंद्रावर क्वारंटाईन करण्यात आले आहे. तळेगाव शहरात कोरोनाबाधित व्यक्ती आढल्यामुळे शहर परिसरास कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर केले आहे. 

तळेगाव स्टेशन विभागातील परिचारिका महिला पुणे येथे खाजगी रुग्णालयात सेवेला होती तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होताच तिला प्रशासनाने पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी  दाखल केले, तसेच संबंधित महिला राहणा-या  इमारतीमधील  सर्व सदनिकाधारक तसेच तिच्याकडे अत्यावश्यक सेवा देणारे घटक अशा 28 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ प्रविण कानडे आणि मुख्याधिकारी दीपक झिंजाड तसेच तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी कोरोना संसर्गास प्रतिबंध म्हणून त्यांना ताब्यात घेऊन तळेगावातच क्वारनटाईन केले आहे.

कोरोनाबाधित महिला राहात होती तो संपूर्ण परिसर पोलिसांनी सील करून कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तर शहर परिसरातील तीन किलोमीटर परिक्षेत्रातील भागही कंटेन्मेंट झोन करून सील केला आहे.या घटनेनंतर तळेगाव शहरात भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तळेगाव शहर हा भाग केंद्रस्थानी धरून तीन किलोमीटरच्या परिसरातील गावांना कंटन्मेट झोन व तळेगाव शहर हा भाग केंद्रस्थानी धरून पाच किलोमीटरच्या परिसरातील गावांना संपूर्ण बफर झोन म्हणून गुरूवार (दि 7मे) घोषित करण्यात आले.

कंटेन्मेट झोनच्या पार्श्वभूमीवर तळेगाव स्टेशन आणि गाव भागात घरटी सर्वे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तळेगाव शहरात कडक नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून क्रांती चौकात जाणारा रस्ता सील करण्यात आला असून तळेगाव स्टेशन परिसर, मराठा क्रांती चौक, सोमाटणे टोल नाका, लिंब फाटा, मारूती मंदिर चौक या सर्व ठिकाणी पोलीस येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची व वाहनांची कडक तपासणी करीत आहेत.

या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्य ,भाजीपाला, फळे  सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहतील. मटण, चिकन व मासळी यांची किरकोळ विक्री दुकाने ही बुधवार, शुक्रवार व रविवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू  राहतील. इतर दिवशी ही दुकाने बंद राहतील.

घरपोच दूध वितरण सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहील. शहरातील सर्व रूग्णालये, दवाखाने व औषध दुकाने, वैद्यकीय टेस्टिंग लॅब यांना वेळेचे कोणतेही बंधन नसेल, असे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.