Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर

एमपीसी न्यूज – आगामी आर्थिक वर्ष २०२० -२१ साठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अर्थसंकल्प (बजेट) सोमवारी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखालील नगरपरिषद सभागृहातील विशेष सभेत तीन तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आला. शुक्रवारी (दि.२८) स्थगित करण्यात आलेली विशेष सभा सोमवारी घेण्यात आली.

विशेष सभेस विविध विकासकामांवरील खर्च, महसुली आणि भांडवली जमा-खर्चाचा तपशील सभागृहापुढे ठेवण्यात आला. त्यावर साधकबाधक चर्चा करत मंजुरी देण्यात आली.

व्यासपीठावर उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड उपस्थित होते. सकाळी११.३०वाजता विशेष सभेस सुरवात झाली. नगरपरिषदेचे लेखापाल अजित खरात यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले.

कोणतीही करवाढ नसलेला २३३ कोटी ६१ लाख ५६ हजार रूपये खर्चाच्या तरतुदीचा आणि ३ लाख ७० हजार ६१५ रूपये शिल्लकीचा अर्थसंकल्प आज सभागृहात मंजूर करण्यात आला.

आगामी आर्थिक वर्षासाठीच्या या अर्थसंकल्पात प्रारंभिक शिल्लक ६० कोटी ५६ लाख ४८ हजार २९३ रूपये दाखविण्यात आली आहे. महसुली आणि भांडवली अशी एकूण जमा रक्कम १७३ कोटी ८ लाख ७८ हजार ३२२ रुपये इतकी आहे. कोणतीही वजावट नसल्याने प्रारंभिक शिल्लकेसह एकूण २३३ कोटी ६५लाख २६ हजार ६१५ रूपये जमेची तरतूद त्यात करण्यात आली आहे.

यावेळी विविध विषयांवरील तरतुदी आणि खर्चांवर जोरदार चर्चा झाली. मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. सुमारे तीन तास झालेल्या वादळी चर्चेनंतर गतवर्षीचे दुरूस्ती अंदाजपत्रक आणि आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

अंदाजपत्रकाच्या चर्चेत उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, सत्तारूढ पक्षनेते अमोल शेटे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, सुशील सैंदाणे,अरुण भेगडे पाटील, संतोष भेगडे, नगरसेविका शोभा भेगडे, हेमलता खळदे, कल्पना भोपळे, संगीता शेळके, काजल गटे यांनी भाग घेतला.

दरम्यान विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितले, की शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ४१ दुरूस्त्या सुचविल्यामुळे हे अंदाजपत्रक आज सभागृहात मांडता आले. नागरिकांना २४ तास पाणी-पुरवठा सुरू होईपर्यंत नळ मीटरची सक्ती करू नये. गेल्यावर्षी प्रशासनाने शासनाकडे दलितवस्ती सुधारणा योजनेचा प्रस्तावच पाठविला नसल्याने तालुक्याला राज्यमंत्रीपद असूनही अनुदान मिळाले नाही. वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा एक रूपयाही प्राप्त करून घेता आला नाही. नगराध्यक्षा आणि तत्कालीन मुख्याधिकारी हेच यास जबाबदार आहेत.

  • अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये :
    स्मशानभूमी विकास ५५लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
    ५ टक्के दिव्यांग(अपंग)कल्याणकारी योजना २कोटी ४२लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    नाट्यगृह उभारणी ११लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
    डोळसनाथ महाराज नागरिकांचा अपघात विमा नुकसानभरपाईत सर्पमित्रांना स्थान देण्यात आले आहे. यासाठी यावर्षी २५लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    आगामी काळातील नगरपालिकेच्या निवडणूक खर्चासाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    गतवर्षी पाणी मीटर बसविण्यासाठी खर्च ३० लाख रुपये गृहीत धरला होता.
    यावर्षी पाणी मीटर बसविण्यासाठी शून्य रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    शहर सौंदर्यीकरण व ऐतिहासिक वास्तू जतन ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    गणेशमूर्ती विसर्जन कृत्रिम तलावासाठी २७ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    सुरक्षा खर्च (सीसीटीव्ही) १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    अनधिकृत नळ कनेक्शन शोध आणि बील वाटप यासाठी१०लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे२०लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.