Talegaon Dabhade अर्थसंकल्पावर बोलावलेली सभा तहकूब करण्याची सत्ताधारी भाजपावर नामुष्की

एमपीसी न्यूज- स्थायी समितीची मंजुरी न घेताच दुरूस्ती केलेला अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यात आला, या मुद्यांवरून शुक्रवारी (दि. 28) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची विशेष सभा गाजली. विरोधकांनी प्रश्नांचा भडिमार करीत नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आणि नगरपरिषद प्रशासनास जेरीस आणले. प्रचंड गदारोळाची परिस्थिती पाहून नगराध्यक्षांनी सभा अखेर अनिश्चित काळासाठी तहकूब केली.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली गतवर्षीच्या अंदाजपत्रकातील दुरूस्ती आणि आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर विचार करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड उपस्थित होते.

दरम्यान, विरोधी बाकावरील तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी कोरम अभावी सभा तहकूब करण्याची सूचना केली. नगराध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभा तहकूब केली. त्यानंतर 11 वाजून 40 मिनिटांनी सभेस सुरवात झाली. ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांची संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपाचे सभागृह नेते अमोल शेटे यांनी मांडला. याचे सर्व सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.

दरम्यान, 14 जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वस्तुस्थितीला धरून दुरुस्तीचे अंदाजपत्रक पुन्हा स्थायी समितीसमोर मांडण्याचे ठरले असतानाही दुरुस्ती अंदाजपत्रकास स्थायी समितीची मंजुरीही घेण्यात आली नसल्याच्या मुद्दयावर भर देत नगराध्यक्षांना त्याचा खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली. याबाबत सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, नगरसेवक गणेश खांडगे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, वैशाली दाभाडे, संतोष भेगडे यांनी आक्रमक भूमिका घेतली.सभागृह नेते अमोल शेटे वगळता भाजपाच्या इतर एकाही सभासदाने नगराध्यक्षांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही.

स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये अंतिम मंजुरी न घेता सभागृहात मांडण्यावर आक्षेप घेतला. अंदाजपत्रकास स्थायी समितीची शिफारस का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित करून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना चांगलेच धारेवर धरले. कर्तव्यात कसूर करता, तळेगावचा कारभार करायला वेळ नाही का ? खोटे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये का आणले ? असे प्रश्न उपस्थित करून नगराध्यक्षा जगनाडे आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

सभागृहास गृहीत धरता का ?चुकीचा विषय करू नका, नगरपरिषद सदस्यांची माफी मागा अशी मागणी गणेश खांडगे यांनी केली. अमोल शेटे यांनी
अंदाजपत्रकाचा विषय महत्वाचा असल्याने सभा पुढे चालू ठेवण्याबाबत सभागृहाला विनंती केली. यावर चुकीचा पायंडा पाडू नका आणि कोणावरही पांघरूण घालू नका असे किशोर भेगडे यांनी सुनावले. संतोष भेगडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली.

उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सभागृह नेते अमोल शेटे यांना टोला लगावत कॉन्ट्रॅक्टरवर तुमची पकड आहे तशी प्रशासनावर का नाही, असा सवाल केला. किशोर भेगडे यांनी सत्ताधारी भाजपास बजेटचे गांभीर्य नसल्याचा आरोप करून नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारावर सडकून टीका केली.
जनसेवा विकास समितीचे नगरसेवक गणेश खांडगे यांनी सत्ताधारी मंडळी सभागृहास गृहित धरून कामकाज करत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्ष नेते गणेश काकडे यांनी सदर बजेट हे ५० कोटी रूपयांनी फुगवून दाखवल्याचा आरोप केला. जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे यांनीही नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या मनमानी कारभारावर सडकून टीका केली.

नगराध्यक्षांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमुळे अर्थसंकल्पावरील सभा रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर ओढवली. यावेळी जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, किशोर भेगडे, गणेश खांडगे, गणेश काकडे, वैशाली दाभाडे यांनी नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

नगराध्यक्षांनी सभागृह सोडल्यानंतर उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे आणि नगरसेवक किशोर भेगडे यांनी सत्ताधारी पक्षाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे तळेगावची वाट लागेल, असा गंभीर आरोप जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे यांनी केला. नगराध्यक्षांनी लेखी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.