BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : कथा तळेगाव स्टेशन विभागातल्या दूर …गेलेल्या पोस्ट ऑफिसची !

एमपीसी न्यूज- तळेगाव स्टेशन विभागातील पोस्ट ऑफिसचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे त्यामुळे तळेगाव स्टेशन, वतन नगर,यशवंत नगर तपोधाम, चाकण रस्ता, वराळे या भागातील रहिवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाची व्यथा मांडली आहे तळेगावातील एक ज्येष्ठ नागरिक विश्वास देशपांडे यांनी…….

तळेगाव दाभाडे गावच्या भौगोलिक रचनेनुसार तळेगाव गाव विभाग (पिन-410506 ) व तळेगाव जनरल हॉस्पिटल तळेगाव स्टेशन विभाग ( 410507) अशी दोन पोस्ट ऑफिस कार्यरत होती. तळेगाव जनरल हॉस्पिटल पोस्ट ऑफिस गेली 70 वर्षे अविरत चालू होते. पण सदर पोस्ट ऑफिसची जागा नियोजित रस्ता रुंदीकरणात येत असल्यामुळे व पोस्ट ऑफिसला या विभागात इतर जागा उपलब्ध न झाल्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर पोस्ट ऑफिस गावाच्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे तळेगाव स्टेशन, वतन नगर, यशवंत नगर तपोधाम, चाकण रस्ता, वराळे या भागातील रहिवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे.

तळेगाव स्टेशन विभागातील निवृत्त नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तळेगाव जनरल हॉस्पिटल पोस्ट ऑफिसमधून निवृत्ती वेतन, मासिक व्याज योजना, बचत खाते, किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत योजना, पोस्ट कार्ड, मनीऑर्डर, पोस्ट तिकिटे अशा विवध प्रकारची सेवा घेत होते. त्यासाठी त्यांना सतत पोस्ट ओफिसशी संपर्क ठेवावा लागत होता. आता या सगळ्या कामांसाठी त्यांना 5 ते 6 कि.मी. जाणे येणे करावे लागते आहे. हे सर्वांना आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या जिकीरीचे आणि त्रासदायक आणि वेळेचा अपव्यय करणारे होत आहे.

गेल्या 30 ते 35 वर्षात स्टेशन विभागाचा झपाट्याने विकास झाला आहे आणि अजूनही होत रहाणार आहे. त्या दृष्टीने स्टेशन विभागात जादाचे पोस्ट ऑफिस सुरु करणे अपेक्षित असताना आहे तेच पोस्ट ऑफिस 5 ते 6 कि.मी.दूर तळेगाव गाव विभागात स्थलांतरित झाले आहे. देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकाभिमुख विविध सुधारणा होत असताना तळेगाव दाभाडे येथे मात्र ग्राहकांच्या अडचणी वाढविल्या जात आहेत.

तरी तळेगाव स्टेशन विभागातील पोस्ट ऑफिस लवकरात लवकर परत सुरु करावे ही अपेक्षा आहे. तळेगावकरांचे दुर्दैव हे की कोणाही लोकप्रतिनिधीला , प्रशासकीय अधिकाऱ्याला यात लक्ष घालावेसे वाटत नाही. तळेगाव नगर परिषद, डायरेक्टर ऑफ पोस्ट ऑफिस पुणे जिल्हा यांचेकडे अर्ज केले आहेत पण प्रतिसाद शून्य …… .यात कोणी लक्ष घालून जेष्ठ नागरिकांची अडचण सोडवेल का? असा सवाल विश्वास देशपांडे यांनी केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3