Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे प्रेस क्लबतर्फे मराठी पत्रकारिता दिन साजरा

एमपीसी न्यूज- संपर्क, संवाद आणि माहितीची देवाणघेवाण यातून पत्रकार आणि पोलीस अधिक प्रभावी कामे करू शकतील. सामाजिक सलोखा राखताना या दोघांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडेचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी रविवारी (ता.६) तळेगाव दाभाडे येथे केले.

मराठी पत्रकारिता दिनानिमित्त तळेगाव दाभाडे प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष विलास भेगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दशरथ ढोरे होते.

मराठी पत्रकारितेचे योगदान केवळ स्वातंत्र्य चळवळीपुरतेच मर्यादित नसून सामाजिक सुधारणा आणि विकासातही मोठे राहिले आहे, असे मत तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष अमीन खान यांनी व्यक्त केले. सामाजिक भान राखून जनहितासाठी पत्रकारिता करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. ती लीलया पेलण्यासाठी लोकसंवाद, माहितीचे अचूक विश्लेषण आणि तारतम्य राखता आले तर त्यातून प्रभावी बातमीदारी करता येईल. बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेने वास्तव आणि लोकहिताच्या लेखणीचा दाखवलेला मार्ग आजही मोलाचा आहे, असे खान यांनी सांगितले.

यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रेस क्लबचे सदस्य कटिबद्ध असून यावर्षात विविध विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रेस क्लब अध्यक्ष विलास भेगडे यांनी सांगितले. दशरथ ढोरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांनाही वाचा फोडण्याचे काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी दिलीप भरेकर, विश्वास पाटील, विठ्ठल वडेकर, युवराज वाघमारे आदी पोलीस कर्मचारी व ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव (गुरूजी), गणेश दुडम, संदीप भेगडे, संकेत जगताप, बद्रीनारायण पाटील, कैलास भेगडे, अंकुश दाभाडे व प्रेस क्लबचे सदस्य उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन ऋषिकेश लोंढे यांनी केले. संयोजन प्रभाकर तुमकर, महेश भागीवंत आणि सहकाऱ्यांनी केले. आभार अमीन खान यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.