Talegaon Dabhade : प्रभाग क्रमांक 1 ब मधील पोटनिवडणुकीसाठी अजून एकाही इच्छुकाचा अर्ज नाही

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 ब मधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत एकाही इच्छुक उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. अशी माहिती मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

भाजपाचे नगरसेवक संदीप शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी संदीप शेळके यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. ही कारवाई मनमानी आणि सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप करीत कारवाईच्या निषेधार्थ शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.

गुरुवारी किंक्रांत असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसावेत अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शनिवारी,दि. 18 जानेवारी रोजी अर्जाची छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार, दि.23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मतदान गुरुवारी, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत होणार आहे. मतमोजणी शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) होणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.