Talegaon Dabhade : उद्यान विभागातर्फे यंदा नागरिकांना फळझाडांची रोपे मोफत मिळणार

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उद्यान विभागातर्फे यंदा नागरिकांना आंबा, चिकू, नारळ अशा फळझाडांची रोपे देण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या घराच्या मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करावी असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याने यंदा राज्यामध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषद देखील या वृक्ष लागवड संकल्पात सहभागी असून एप्रिल महिन्यापासून उद्यान विभागाकडून वृक्ष लागवड हाती घेतली आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात, परिसरातील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करावी यासाठी नगरपरिषदेच्या वतीने रोपांचे मोफत वाटप केले जात आहे.

या रोपांमध्ये उच्च प्रतीची कलमी रोपे आणि उत्पन्न देणाऱ्या रोपांचा समावेश आहे. केशर आंबा, चिकू, नारळ आदी प्रकारची रोपे मोफत देण्यात येत आहेत. अशी माहिती उद्यान विभाग प्रमुख विशाल मिंड यांनी सांगितले. ही फळझाडे घेणाऱ्या लाभार्थी नागरिकांकडून स्वेच्छेने वृक्षलागवडीसाठी मागणी अर्ज, त्यासोबत वृक्ष संवर्धन करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दोन वर्षे पूर्ण झालेली ३ हजार फळझाडांची रोपे वाटण्यात येणार आहेत. मोफत वृक्ष वाटपासंबंधी अधिक माहितीसाठी नागरिकांनी उद्यान विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.