Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या सर्वसाधारणसभेत विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्तारूढ भाजपची कोंडी

एमपीसी न्यूज- सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाच्या गलथान कारभारावर सडकून टीका करीत विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सोमवार (दि. 13) सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर अंकुश राहिला नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला तर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व प्रशासनाला लक्ष्य करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी पटलावरील अनेक विषय स्थगित ठेवण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर ओढवली. जनसेवा विकास समितीने भाजपची साथ सोडल्याचा परिणाम सोमवारच्या सर्वसाधारण सभेत पहावयास मिळाला.विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती एकत्र आल्यामुळे सत्ताधारी भाजपाला ठराव पारित करताना अडचणी आल्या.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सभा सुरू झाली. यावेळी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सभेला भारतीय जनता पक्षाचे सात नगरसेवक, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे सात तर जनसेवा विकास समितीचे पाच नगरसेवक उपस्थित होते. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती तसेच जनसेवा विकास समितीचे नगरसेवक एकत्र आल्याने सर्वसाधारण सभेत त्यांचेच वर्चस्व पहावयास मिळाले. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे आणि जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, नगरसेवक गणेश काकडे, रवींद्र आवारे, संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे, हेमलता खळदे, रोहित लांघे, अनिता पवार यांनी आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्षांची कोंडी केली. प्रशासनावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले.

नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा गंभीर आरोप किशोर भेगडे यांनी केला. तळेगाव शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी 14 वा वित्त आयोग योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीमधून पूर्वी प्रमाणे दुबार पध्दतीने (दिवस व रात्र) कचरा संकलन करावे अशी उपसूचना किशोर भेगडे यांनी मांडली. या उपसुचनेस नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी मान्यता दिली. तळेगाव स्टेशन भागातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या चुकीच्या कामाबद्दल गणेश काकडे, रवींद्र आवारे यांनी तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला फैलावर घेतले. नगरपरिषदेतील विकासकामे ठेकेदारांच्या मर्जीतून होत असल्याचा आरोप संतोष भेगडे यांनी केला.

नागरी दलित वस्ती योजने अंतर्गत कामकाज व्यवस्थित होत नसल्याचा आरोप गणेश काकडे, वैशाली दाभाडे, अरुण माने, अनिता पवार यांनी केला.
मंगल जाधव यांनी जिजामाता चौक ते गणपती चौक दरम्यान केलेल्या रस्ता खोदाई संदर्भात नाराजी व्यक्त केली.यावेळी विविध विकासकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

नगरपरिषदेने सिटीसर्वे 5719 ते 5722मध्ये टाकलेले रस्त्याचे आरक्षण अथवा प्रस्तावित रस्ता रद्द करावा अशी मागणी नगरसेविका प्राची हेंद्रे यांनी केली. नगररचना विभाग,आरोग्य विभाग,आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग उद्योन विभाग, लेखा विभाग व आस्थापना विभागातील पटलावरील काही विषयांना स्थगिती देण्यात आली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गलथान प्रशासकीय कारभारामुळे विरोधकांच्या घणाघाती टीका व आक्रमक पवित्र्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात आरोप-प्रत्यारोपांनी गाजली.

उपनगराध्यक्ष, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते तसेच भाजपचे प्रमुख नगरसेवक सभेस गैरहजर

सभेला सुरुवात होताच नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तुलना केल्याबद्दल निषेधाचा ठराव मांडला, तर नव्यानेच निवडून आलेल्या नगरसेविका संगीता शेळके यांचा अभिनंदन ठराव नगरसेवक गणेश काकडे यांनी मांडला. यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

जे नगरसेवक आणि पदाधिकारी सभेस हजर नसतात. त्यांच्या सह्या ठरावावर सूचक ,अनुमोदक म्हणून कशा घेतल्या जातात ? तसेच ठरावातील सूचक अनुमोदक कसे बदलले जातात याबाबत नगरसेवक गणेश काकडे यांनी नगराध्यक्षांना जाब विचारला. स्वच्छतेच्या नावाखाली नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत असून प्रशासनाकडून ठेकेदाराची संगनमत करून खोटी बिले काढली जातात असा आरोप सुलोचना आवारे, रवींद्र आवारे यांनी केला तर सत्तारूढ पक्षाचे काही नगरसेवक ठेकेदारांची बिले काढण्यावरून एक टक्का रक्कम मागतात असा आरोप नगरसेवक संतोष भेगडे यांनी केला. स्टेशन विभागात चालू असलेल्या जलवाहिन्यांच्या कामाला स्थगिती द्यावी, तसेच साठवण टाकी ,जलशुद्धीकरण, विद्युतपंप आदी कामे पहिली करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली. जे सदस्य सभेस उपस्थित नव्हते त्यांनी सभेत मंजुरीसाठी दिलेले ठराव स्थगित ठेवण्याची मागणी नगरसेवक संतोष भेगडे यांनी केली आणि ती मंजूर करण्यात आली.

सभेची वैशिष्ट्ये:
# नवीन बांधलेल्या क्रीडासंकुलास पै. विश्वनाथराव भेगडे नाव देण्यास मंजुरी.
# घनकचरा संकलन दुबार करणे
# सभा कामकाजात विरोधकांचा पूर्ण वरचष्मा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.