Talegaon Dabhade : ठेकेदार नाही म्हणून कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या नव्या गाड्या धूळखात पडून

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळालेल्या १४ नवीन कचरा वाहतूक गाड्या केवळ ठेकेदार न मिळाल्याने त्या गेल्या सहा महिन्यापासून नगरपरिषद आवारात धूळ खात पडून आहेत. तर या गाड्यामधून कचरा वाहतूक न झाल्याने नगर परिषदेला लाखो रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राज्य शासनाने कचरा वाहतूक करण्यासाठी महिंद्रा कंपनीच्या १४ पिकअप व्हॅनसाठी १ कोटी ८ लाख ४३ हजार रुपये मंजूर होऊन त्या अनुदानातून बांधणी करून तयार गाड्या नगर परिषदेला मिळाल्या. या नवीन कचरा वाहतूक गाड्या जून महिन्यात नगर परिषदेच्या आवारात दाखल झाल्या असून त्या गाड्या चालविण्यासाठी प्रत्येक गाडीसाठी चालक आणि एक कर्मचारी यांचा ठेका वेळेत मंजूर न झाल्याने गेली सहा महिने या गाड्या धुळ खात पडल्या आहेत.

या गाड्या वेळेत सुरु झाल्या असत्या तर पूर्वीचा टॅक्टरने कचरा वाहतूक करण्याचा ठेका यासाठी नगरपरिषदेला प्रत्येक महिन्याला सुमारे १७ लाख रुपये खर्च येतो. तर या नवीन गाड्या चालविण्याचा ठेका वेळेमध्ये दिला असता तर महिन्याला सुमारे १० लाखाच्या पुढे नगरपरिषदेची बचत झाली असती. असे आरोग्य विभागाकडून माहिती घेता समजले.

याबाबत मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना विचारले असता या गाड्यांच्या ठेकेदारी बाबत तातडीने कारवाई करून गाड्या लागलीच चालू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

ही नगरपरिषद आहे की महिंद्रा गाड्यांची शोरूम ?

शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळालेल्या 14 नवीन कचरा वाहतूक गाड्या नगर परिषदेच्या दर्शनी भागात पार्किंग केल्या असून नागरिक जाता येता ‘ही नगरपरिषद आहे की महिंद्रा गाड्यांचे शोरूम’ अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.