Talegaon Dabhade : ‘जनता कर्फ्यू’ला तळेगांवकरांचा उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज – तळेगावकर नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला रविवारी चांगला प्रतिसाद दिला. रविवारी सकाळपासूनच शहरातील रस्ते ओस पडले होते. सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला.

‘जनता कर्फ्यू’च्या पार्श्वभूमीवर बहुतांशी तळेगावकर नागरिकांनी रविवारी घरातच थांबणे पसंत करून स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. नागरिकांनी शासकीय आदेशाचे पालन करून राष्ट्रीय संकटप्रसंगी आम्ही सर्व एक आहोत हे दाखवून दिले.

तळेगाव शहर परिसरातील मुख्य रस्त्यावर भयान शांतता होती. तळेगाव स्टेशन विभाग ,गाव विभाग तसेच मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता.रविवारी भाजीपाला दुकाने आणि दुधडेअऱ्या बंद होत्या. एरवी वाहनांच्या वर्दळीने गजबजलेले मुख्य रस्त्यांनी आज मोकळा श्वास घेतला. रविवारी सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट होता.

दरम्यान,तळेगाव शहरात आजपर्यंत एकूण 34 जणांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यावर तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपरिषद प्रशासनाची करडी नजर आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परदेश गमन करून आलेल्या नागरिकांनी नगरपरिषद अथवा तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतः होऊन माहिती द्यावी, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड आणि तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रवीण कानडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.