Talegaon Dabhade: भाडेकरू सोडून गेलेल्या मिळकतींना करातून सूट द्यावी – किशोर भेगडे

Talegaon Dabhade: Tax exemption should be given to the property left by the tenant - Kishor Bhegade

एमपीसी न्यूज –  भाडेकरू सोडून गेलेल्या मिळकतींना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मिळकतकरात (प्रॉपर्टी टॅक्स) सूट द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात भेगडे यांनी म्हटले आहे की, कोविड-19 या साथीच्या रोगामुळे तळेगाव शहरातील अनेक कामगार आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे अनेक नागरी वस्त्या ओस पडलेल्या आहेत. अनेक स्थानिक नागरिकांच्या निवासी जागा भाड्याने देण्याचा व्यवसाय असून कामगार आपापल्या गावी गेल्यामुळे स्थानिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून देशभरात लाॅकडाऊन सुरू आहे. चौथ्या लाॅकडाऊनचा टप्पा चालू आहे. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात भाडेकरू सोडून गेलेल्या मिळकतींना मिळकत करातून (प्रॉपर्टी टॅक्स) सूट द्यावी तसेच अनेक नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यामुळे मिळकत कर भरण्यास नागरिकांना उशीर होणार असल्याने मिळकत करावर दंड म्हणून आकारण्यात येणारे दरमहा २% व्याज आकारण्यात येऊ नये, अशी मागणी भेगडे यांनी केली आहे. यासंदर्भात आदेश जारी करावा, अशी विनंती निवेदनात केली आहे.

स्पोर्टस् काॅम्प्लेक्स नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी – किशोर भेगडे 

नगर परिषदेचे मारुती मंदिर येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्स नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी केली आहे. याविषयी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. त्यात भेगडे यांनी म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या या संकुलामध्ये महिलांसाठी व पुरुषांसाठी असलेल्या व्यायामशाळेमध्ये व्यायामसाहित्य तसेच इनडोअर गेम्स (उदा. कबड्डी व कुस्ती) मॅटस व इतर अनुषंगिक साहित्य पुरविणे, व्यायाम शाळेसाठी व इनडोअर गेम्ससाठी प्रशिक्षक नेमणे तसेच स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे पाथवे करणे इत्यादी कामे आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन व उपलब्ध करुन देऊन जून -जुलैपर्यंत हे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स नागरिकांना खुले करुन द्यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.