Talegaon Dabhade : तंत्रज्ञानाचा वापर विधायकतेसाठी व्हावा – डाॅ नितीन करमळकर

एमपीसी न्यूज- तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर विधायकतेसाठीच केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाची भीती न बाळगता ते आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ नितीन करमळकर यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून करमळकर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे होते.

याप्रसंगी यशोदा टेक्नीकल इन्स्टिट्यूट साताराचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे, मावळ तालुक्याचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, विश्वस्त मुकुंदराव खळदे, गोरखभाऊ काळोखे, रामदास काकडे, सुरेशभाई शहा, डाॅ दीपक शहा, शैलेश शहा, चंद्रकांत शेटे, पुष्पाताई वाडेकर, पी डी सी सी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, डाॅ एस के मलघे, मा ता भाजपा अध्यक्ष प्रशांत ढोरे, गणेश भेगडे, संदीप काकडे, चंद्रभान खळदे, विलास काळोखे, डाॅ बी बी जैन, डाॅ जी एस शिंदे, प्रा एस ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

डाॅ करमळकर पुढे म्हणाले की, शिक्षण हे संस्काराचे मुख्य केंद्र आहे. तेथे शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणही तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयातून औद्योगिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम आणणे ही गरज आहे. तरच विकासाचा वेग- काळाबरोबर गतिमान करता येईल. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांची आहे. कारण बेरोजगारीमुळे विद्यार्थी वाममार्गाला लागून देशाचे नुकसान होण्याची भीती आहे. मोबाईलमुळे संवाद हरवत चालला असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.

“अभ्यासक्रमात समाजातील घटक असले पाहिजेत. कामांचे स्वरूप बदलत आहे. सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. त्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धती यायला हवी त्यासाठी ‘रिसर्च इनोव्हेशन पार्क ‘ची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचे उदघाटन 15 जानेवारी रोजी पंतप्रधानांचे हस्ते करण्यात येणार आहे. ‘रिसर्च इनोव्हेशन पार्क’ची सावित्रीबाई फुले विद्यापीठात स्थापना करण्यात येणार असून ते महाराष्ट्रातील पहिले रिसर्च पार्क असणार आहे. याच माध्यमातून उद्योगांना निमंत्रित करणार आहोत. ‘लिबरल आर्टस ‘ सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ असेल. सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना काम देण्याच्या उद्देशाने ते फायदेशीर ठरणार आहे ” असे डाॅ करमळकर म्हणाले.

आमदार बाळा भेगडे म्हणाले की, ज्ञान आणि भक्ती असणारा हा तालुका आहे. मावळ तालुक्याचे शिक्षणाचे माहेरघर तळेगाव आहे. मोबाईलचे युग आहे. या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी मिळत आहे. आज विद्यार्थी मोबाईलमय झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल दूर ठेवत ज्ञान आत्मसात करावे, तसेच मैदानी खेळाला महत्त्व द्यावे. महाविद्यालयात क्रीडा साहित्यासाठी दहा लाख रुपयांच्या निधीची घोषणाही आमदार भेगडे यांनी केली.

दशरथ सगरे म्हणाले, “प्रगतीला टीम चांगली असेल तर ती संस्था कधी खाली येत नाही. त्या संस्थेचा आलेख उंचावत जातो. एका विचाराचे लोक एकत्र आल्याने संस्था मोठी होत असते. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संस्कारांची शिदोरी आत्मसात करावी. साधे राहणीमान जपत आदर्श विद्यार्थी होण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा”

फार्मसी नूतन वास्तूचे उदघाटन आणि कै केशवराव वाडेकर ग्रंथालयाचे नामकरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘ कांचनगंध ‘ या विशेषांक स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विविध विद्याशाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रायोजक, संतोष खांडगे, संजय साने, रवींद्र भेगडे, सुहास गरूड, संजय वाडेकर, निरूपा कानिटकर आदींचा सत्कार करण्यात आला.

प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षात महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या अंशकालीक व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. के व्ही अडसूळ, एस पी भोसले, कन्हेरीकर मॅडम यांनी, तर आभार संस्थेचे विश्वस्त शैलेश शहा यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.