BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : तळ्यातील गाळ काढताना आढळली पुरातन विहीर!

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना बारीक विटा आणि चुनखडीचा वापर करून बांधलेली एक पुरातन विहीर आढळून आली आहे. ही विहीर पाहण्यासाठी सध्या इतिहासप्रेमींची गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे.

तळेगाव दाभाडे हे ऐतिहासिक शहर असून गावात दोन तळी आहेत. स्टेशन भागात ईगल फ्लास्क कंपनीच्या मागे असणाऱ्या तळ्याचे पाणी काही दशकांपूर्वी पिण्यासाठी वापरले जायचे. या तळ्यातील गाळ काढून त्याची खोली वाढविण्याचे काम सुमारे दोन वर्षांपासून सुरू आहे. तळ्यातील गाळ काढण्यासाठी खोदकाम सुरू असताना या पुरातन विहीरीचा शोध लागला आहे.

  • तळ्यातील गाळ काढून तळ्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने माजी उपनगराध्यक्ष व पर्यावरणवादी कार्यकर्ते गिरीश खेर यांनी पुढाकार घेतला. शासन व नगरपरिषदेच्या परवानगीने आतापर्यंत हजारो ट्रक गाळ काढण्यात आला आहे. हे काम चालू असताना विहीरीचा पुरातन ठेवाही उजेडात आला आहे.

ही विहीर तळ्याच्या मध्यभागी असल्याने तसेच विहिरीला उंची जास्त असल्याने पावळ्यात तळे भरेल तेव्हा ती पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात तळ्याचे पाणी कमी होईल, तेव्हाच ही विहीर पुन्हा पहायला मिळू शकणार आहे. त्यामुळे ही सुंदर बांधकाम असलेली पुरातन विहीर पाहण्याची संधी आताच नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक दीपक फल्ले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3