Talegaon Dabhade : कलावंताने स्वत:ला कधीही परिपूर्ण समजू नये- मकरंद अनासपुरे

एमपीसी न्यूज- कलावंत हा नेहमी शिकत असतो. कलावंताने स्वत:ला कधीही परिपूर्ण समजू नये, असे मत सुप्रसिद्ध नाट्य, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. तळेगाव- दाभाडे येथील कलापिनी या संस्थेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, उपाध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, विश्वस्त शिरीष जोशी व विश्वस्त डॉ. अनंत परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. कलापिनीच्या वाटचालीचा आढावा घेणारे छायाचित्र प्रदर्शन व कलापिनी आयोजित बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन अनासपुरे यांच्या हस्ते झाले.

  • दिनेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या व विनायक लिमये यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सावनी परगी, विराज सवाई, विनायक लिमये यांनी नांदी व गीत सादर केले. चेतन पंडित व ह्रितिक पाटील यांनी आबुराव- बाबुराव हे स्कीट सादर केले.

श्रीधर कुलकर्णी, डॉ. विनया केसकर, डॉ. अनंत परांजपे यांनी मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेतली. अतिशय साधेपणाने त्यांनी आपली मते मांडली. अनासपुरे म्हणाले, “कलावंताने आपल्या मातीचे मूळ सोडू नये. आपल्या भाषेत बोलणे आणि काम करणे गरजेचे आहे. वाचन आणि निरीक्षण यामुळे कलावंत घडतो. आपली संस्कृती, परंपरा युंचा आपण आदर ठेवला पाहिजे. माध्यम कोणतही असो कलाकाराने आपल्यातला साधेपणा आणि माणुसकी सोडता कामा नये”

  • यावेळी अनासपुरे यांच्या हस्ते कलापिनीच्या गुणी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. वरद बेडेकर, गौरी पोलावर, वैदेही देशमुख, मनवा वैद्य (बालभवन सितारा), उषा धारणे, माधव रानडे (हास्ययोग), विजय कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी, श्रीधर कुलकर्णी (विशेष गौरव पुरस्कार), आरती पोलावर (आश्वासक पदार्पण), प्रणोती पंचवाघ (धडपड पुरस्कार), शार्दूल गद्रे (पडद्यामागचा कलाकार), अविनाश शिंदे, मुक्ता भावसार (लक्षवेधी कलाकार), आदित्य धामणकर (आश्वासक पुरस्कार), चैतन्य जोशी (चतुरस्त्र कलाकार), चेतन पंडित, विशाखा बेके (सर्वोत्कृष्ट कलाकार) यांना अनासपुरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

माधुरी कुलकर्णी, विराज सवाई, अंजली सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत झेंडे यांनी आभार मानले. कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.