Talegaon Dabhade : सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
माजी मंत्री बाळा भेगडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी सोमाटणे (Talegaon Dabhade) टोलनाका कृती समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. टोलनाका बंद करण्याच्या मागणीबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी आंदोलकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये अशा सूचना भेगडे यांनी पोलिसांना केल्या.
सोमाटणे टोलनाका कृती समितीचे प्रमुख किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या बद्दल सकारात्मक चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. तोपर्यत पोलीस विभागाने आंदोलनकर्त्या समाजसेवकांवर, कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई करू नये. अशी सुचना माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पोलिसांना केली.
सोमाटणे टोलनाका कृती समितीने सोमाटणे टोलनाका बंद करा या मागणी बाबत पुकारलेल्या अमरण उपोषणाच्या तिस-या दिवशी भेटी दरम्यान माजी मंत्री बाळा भेगडे बोलत होते.यावेळी मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंगेस अध्यक्ष गणेश काकडे, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, कात्रज डेअरीचे संचालक बाळासाहेब नेवाळे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड,महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सचिव संतोष दाभाडे पाटील, मिलिद अच्युत, कल्पेश भगत आदी नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते,संस्था प्रतिनिधी,अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य व नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
यावेळी भेगडे म्हणाले मागील वर्षी किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली असेच जनआंदोलन पुकारले होते. त्याची नुसती बोळवण केली. पण आता हा टोलनाक्याचा त्रास तळेगाव तसेच मावळ वासियांना सहन होत नाही. याला योग्य न्याय मिळावा (Talegaon Dabhade) म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर आजच बैठक घेणार असल्याचे सांगितले.
उपोषणाला बसलेल्या किशोर आवारे, राजेंद्र जांभुळकर, सुशील सैंदाणे, जमीर नालबंद, निलेश पारगे, योगेश पारगे, प्रशांत मराठे या सर्वांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे.
यावेळी अमरण उपोषणास बसलेले माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे म्हणाले आम्ही टोलनाका बंद करा या भूमिकेशी ठाम आहोत.आम्ही आमची भूमिका माजी मंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे यांचेकडे मांडली आहे. त्यांनीच भविष्यात जनहिताचा योग्य निर्णय घ्यावा. त्याचे अधिकार सोमाटणे टोलनाका कृती समितीने त्यांना दिले आहेत.