Talegaon Dabhade : मावळातील ‘इंद्रायणी’चा सुगंध दरवळणार देश-विदेशात!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन मावळातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मावळातील प्रमुख पिक असलेल्या इंद्रायणी तांदळाला अधिक दर्जेदार बनवून जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर निर्यात करून येथील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी भेटी दरम्यान सांगितले.

‘तांदळाचे आगार’ अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात सुमारे 1200 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर भात पिकाची लागवड होते. त्यात सुवासिक व चविष्ट असणाऱ्या इंद्रायणी वाणाच्या तांदळाला मोठी मागणी असल्याने जागतिक बाजारपेठेत याची निर्यात वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले. स्थानिक बाजारपेठेत इंद्रायणी तांदळाची मागणी वाढवण्यासाठी मावळात इंद्रायणी तांदुळ महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे यावेळी आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत स्थानिक शेतकऱ्यांचे गट करून सेंद्रीय शेतीस चालना देणे, शेतमालाला हमीभाव देणे, शेतीपूरक व्यवसायांना तालुक्यात चालना देणे, स्थानिक बाजारपेठ सक्षम करणे, डोंगरात उपलब्ध होणाऱ्या दुर्मिळ जंगली भाज्यांचे जतन करणे, त्यांना व्यावसायिक बाजारपेठेत स्थान देणे, शेतकऱ्यांना व्यावसायिक पिके घेण्यास प्रोत्साहित करणे आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मावळातील ग्रामीण जीवनशैलीचा अभ्यास करून ती समाजापुढे आणणे, कृषी पर्यटन केंद्रे विकसित करणे, ग्रामीण घरात मुक्काम करून त्यावर अभ्यास करणे आदि सह मावळातील पर्यटनाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याविषयी चर्चा झाली. नाशवंत भाज्या साठवणुकीसाठी तालुक्यात शीतगृह उभारणार असल्याचे यावेळी आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.