Talegaon Dabhade : पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज- डॉ. के.एच.संचेती

अथर्व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज- उपचाराबाबत पेशंट आणि नातेवाईकांना सोप्या भाषेत सांगून त्यांच्याशी सततच्या संवादातून विश्वास निर्माण केला तर डॉक्टरांवरील हल्ल्यासारखे गैरप्रकार होणार नाहीत. तसेच पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के.एच.संचेती यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील अथर्व अ‍ॅक्सिडेन्ट हॉस्पिटलच्या एनएबीएच् अ‍ॅक्रिडिटेड मल्टिस्पेशालिटी अ‍ॅण्ड जॉईन्ट रिप्लेसमेंट सेंटरचे उद्घाटन रविवारी( दि. 2) डॉ. संचेती यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज तसेच मंत्रालयातील अतिवरिष्ठ अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या समारंभातच्या अध्यक्षस्थानी मावळ भूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. माजी राज्यमंत्री मदन बाफना व संजय(बाळा) भेगडे, आमदार सुनील शेळके, मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव सिध्देश्वर मोकाशी, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजीव अरोरा, माजी आमदार दिगंबर भेगडे, सीआरपीएफचे डीआयजीपी बिरेन्द्र टोप्पो, पुण्याचे डीसीपी संभाजी कदम व ग्रामीण सहायक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त शिवराज पाटील, मंत्रालयाचे अवर सचिव अशोक मांडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, पीसीबी अधिकारी राहुल निंबाळकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ.एम्.ए. शेख, अथर्व हॉस्पिटलचे डॉ.राजेन्द्र देशमुख व डॉ.अजित माने, डॉ.पौर्णिमा देशमुख, डॉ.शुभांगी माने यांच्यासह त्यांचे आई वडील आणि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ.राजीव अरोरा यांनी आयसीयू विभागाचे, माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी फिजिओथेरपी विभागाचे, आमदार सुनील शेळके व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे यांच्या हस्ते आयुर्वेद व पंचकर्म विभागाचे तर अमीतकुमार बॅनर्जी यांनी कॅज्युअल्टी तर कृष्णराव भेगडे यांनी ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन केले. शासनाच्या मोफत आरोग्य योजनांच्या फलकांचे अनावरण बाळा भेगडे, दिगंबर भेगडे, बबनराव भेगडे यांनी केले.

डॉ. संचेती आणि डॉ.अरोरा यांच्या हस्ते डॉ.अजित माने, डॉ.राजेंद्र देशमुख, डॉ.शुभांगी माने, डॉ.पौर्णिमा देशमुख यांच्यासह त्यांचे आईवडील कलावती व सुखदेव माने, उषा व रवींद्र देशमुख तसेच आशा व दिनकर बागल आणि उषा व डॉ.अरूण जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. संचेती यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेताना म्हटले की, डॉक्टरांवरील समाजाचा वाढता रोष आणि होणारे हल्ले या गंभीर बाबी आहेत. असे हल्ले का होतात? याचा विचार डॉक्टरांनी केला पाहिजे. उपचाराबाबत पेशंट आणि नातेवाईकांना सोप्या भाषेत सांगून त्यांच्याशी सततच्या संवादातून विश्वास निर्माण केला तर हल्ल्यासारखे गैरप्रकार होणार नाहीत. डॉ. देशमुख व डॉ. माने या शेतकरी कुटुंबातील मुलांनी 100 बेड्सचे हॉस्पिटल उभारले. हे त्यांच्या आई-वडीलांचे आशीर्वाद तसेच सहचारिणी डॉ. पौर्णिमा आणि डॉ.शुभांगी यांची साथ असल्यामुळे ते शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केंद्र सरकारने बजेटमध्ये केलेल्या 69 हजार कोटी रूपयांच्या तरतुदीचा उल्लेख करून विश्वास व्यक्त केला की, देशाच्या आरोग्यविषयक क्षेत्राला त्यामुळे गती मिळेल. डॉ.माने आणि डॉ.देशमुख हे गेली 13 वर्षे परिश्रमातून रूग्णसेवा देत आहेत. अथर्व हॉस्पिटलच्या नूतन इमारतीमधील सोयीसुविधा मुंबईतील हॉस्पिटलच्या तोडीसतोड आहेत. दोन्ही डॉक्टरांच्या रूग्णसेवेच्या वाटचालीस भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी अथर्व हॉस्पिटलच्या उभारणीसाठी शेतक-यांच्या मुलांनी शिस्त, प्रामाणिक मेहनत आणि लोकांचा विश्वास संपादन केल्याचे आवर्जून सांगितले. डॉ. माने आणि डॉ. देशमुख यांच्यासह त्यांच्या टीम डॉक्टर्सचे अभिनंदनही त्यांनी यावेळी केले. मावळात 25 एकर जमीन शासकीय रूग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून शासनाच्या मोफत आरोग्यसेवांसाठी खासगी डॉक्टरांनी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ.शेख यांनी शिक्षण, संस्कार, मित्रमंडळींचे सहकार्य आणि कृतज्ञतेच्या जोरावर डॉ.माने व डॉ.देशमुख यांनी आरोग्यमंदिराचे यश संपादन केल्याचा उल्लेख केला. ही दोन्ही मुले शेतक-यांची असली तरी ती शिक्षकांची मुले आहेत. त्यांचे संगोपन विशेष संस्कारातून झाले आहे. समाजाप्रती आपण देणे लागतो या बांधिलकीतून दोन्ही डॉक्टरांकडून सेवा सुरू आहे. असे सांगून त्यांनी आशीर्वाद दिले.

प्रास्ताविक अथर्व हाॅस्पिटलचे संचालक डॉ. अजित माने यांनी केले. अथर्व मेडिकल फौन्डेशनचे व्यवस्थापकीय संचालक अमीन खान यांनी स्वागत केले. डॉ. माने आणि डॉ. राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांसह पोलीस, आयकर, सेल्स टॅक्स आदि विभागातील वरिष्ठांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. आभार अथर्व हाॅस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र देशमुख यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.