Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयाच्या ‘हेरिटेज वॉक’मध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने आयोजिलेल्या हेरिटेज वॉकमध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला. मावळ तालुक्यातील वितंडगड ऊर्फ तिकोना दुर्ग येथे हि अभ्यास सहल डॉ. प्रमोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

विद्यार्थी वर्गात ‘इतिहास’ विषयाच्या संबंधित जागरूकता वाढीस लागावी, हा यामागील उद्देश होता. हेरिटेज वॉकच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महत्वपूर्ण सूचना दिल्या.

वितंडगडच्या माथ्यावर जाताना संपूर्ण वास्तू व वस्तू पाहून विद्यार्थ्यांनी दुर्गरचनेचा अभ्यास केला. तळजाई लेणी परिसरात वनभोजन घेवून सर्व विद्यार्थ्यांनी साचेबद्ध कार्यक्रम घेतला. दुर्ग इतिहास कथन करताना प्रा. डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले, “वितंडगड – तिकोना दुर्ग हा आज केंद्रीय वा राज्य पुरातत्त्व विभागाकडे नाही. म्हणून आजपर्यंत ज्याप्रमाणे शिवनेरी, देवगिरी, रायगड, लोहगड दुर्गावर सुधारणा झाल्या तशा वितंडगडवर झाल्या नाहीत. म्हणून स्थानिक दुर्गसंवर्धक समुहानी यावर संवर्धन सुरू केले आहे.

गडकोट भटकंती वडगांव मावळ आणि सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थानी येथे दरवाजे लावून दुर्ग भक्कम केला आहे. जगातील पहिला गिरिदुर्गवरील खंदकाचा प्रयोग येथे मराठी राजवटीत केला गेला ही आश्चर्यकारक बाब आहे. हा फक्त टेहळणीचे ठाणे नव्हते तर प्रत्यक्ष भव्य – बलाढ्य दुर्ग होता. इतिहासातील प्रत्येक राजवटीस सदर दुर्ग आपल्याकडे असावा वाटले म्हणून अनेक युद्ध झाल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत.”

विद्यार्थी प्रतिनिधी इमरान शेख, प्रतीक काकरे, वैभव कदम यांनी अभ्यास सहलीचे व्यवस्थापन केले. हेरिटेज वॉक मध्ये महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी डॉ. मधुकर देशमुख, सौ. शैलजा ढोरे, सौ.अश्विनी गोखले, श्री. मच्छिंद्र काकडे हे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा समारोप डॉ. मधुकर देशमुख यांनी केला.

महाविद्यालयाचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी हेरिटेज वॉकच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यवाह रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले तसेच खजिनदार चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.