BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : ‘मी छोटा राजनचा माणूस आहे, पैसे दिले नाहीत तर तुझी गेम करू’

व्यावसायिकाकडे 30 लाखांच्या खंडणीची मागणी; पोलीस पाटलासह पाच जणांवर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – ‘मी छोटा राजनचा माणूस आहे. आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुझी गेम करू’ अशी धमकी देत पाच जणांनी एका व्यावसायिकाकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता उर्से गावाजवळ घडला. याप्रकरणी उर्से गावच्या पोलीस पाटलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.

सुलतान महाभूत मुलाणी (वय 44), गुलाब बबन धामणकर (वय 41), सतीश लक्ष्मण कारके (वय 29) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यांच्यासह पोलीस पाटील गुलाब छबुराव आंबेकर, सुनील बाबुराव आंबेकर (सर्व रा. उर्से ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुलदीप ज्ञानोबा धामणकर (वय 26, रा. उर्से, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलदीप हे व्यावसायिक आहेत. ते 10 फेब्रुवारी रोजी दुपारी उर्से गावाच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पुलावर काम करत होते. त्यावेळी सर्व आरोपी तिथे आले. त्यांनी ‘तू काम कसे काय करतोस, तुझ्याकडे आम्ही पाहून घेतो. तुला काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील’ अशी कुलदीप यांना धमकी दिली. त्यावर कुलदीप यांनी ‘मी सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या आहेत. मी तुम्हाला पैसे देणार नाही’ असे सांगितले.

त्यानंतर आरोपींनी पुलाच्या शेजारी बाळू बजाबा धामणकर यांच्या टपरीच्या समोरील जमिनीत गाडलेली इलेक्ट्रिक लाईनची केबल ट्रॅक्टरच्या सहाय्याने उकरुन काढली. कुलदीप यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी ‘तू आम्हाला पाच लाख रुपये दे आणि गावासाठी 25 लाख रुपये दे’ म्हणत एकूण 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपी सतीश कारके याने ‘मी छोटा राजनचा माणूस आहे. आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुझी गेम करू’ अशी कुलदीप यांना धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये पोलीस पाटलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like